कर्जातून सावरण्याची पाकिस्तानची धडपड
#इस्लामाबाद
पाकिस्तानी मंत्री आता बिझनेस क्लासमधून विमान प्रवास करू शकणार नाहीत. तसेच विदेश दौऱ्यावर असताना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करू शकणार नाहीत. त्याचबरोबर पाकिस्तान सरकारने मंत्री कमी वेतनावर काम करत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. कर्जाच्या विळख्यातून सावरण्यासाठी पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साडेसहा अब्ज डॉलर कर्जाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी पाकिस्तान सरकारने ७४६ दशलक्ष डॉलरच्या काटकसरीचे उपाय जाहीर केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी केलेल्या घोषणेनुसार आगामी अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त लागावी यासाठी आणखी कठोर उपाय योजले जाणार आहेत.
कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी काटकसर ही काळाची गरज असल्याचे सांगून शरीफ म्हणाले की, साधेपणा, त्याग आणि आर्थिक शिस्त पाळणे ही काळाची गरज असून त्याला पाकिस्तान समर्थपणे तोंड देईल.
आर्थिक कर्जबाजारीपणामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेतून जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. ३५० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानकडे एका अंदाजानुसार केवळ ३ अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. डॉलरचा साठा कमालीचा आटल्याने देशाच्या स्थिरतेवर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. पुरामुळे पुरवठा व्यवस्था कोलमडली असून अन्न-धान्याच्या तीव्र टंचाईने सामान्य नागरिक वैतागलेले आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कठोर अटींमुळे देशातील चलनवाढ आता ३० टक्क्यांच्या वर जाईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सध्याच्या स्थिती विरुद्ध सामान्य नागरिक रस्त्यावर येऊन संघर्ष करत असताना काटकसरीच्या उपायांना वरपासून सुरुवात करत असल्याचे सरकार दाखवून देताना दिसत आहे. केंद्र, राज्यांतील मंत्र्यांनी आपले मानधन, सुविधांवर या अगोदरच पाणी सोडले आहे. ऐषआरामाच्या वस्तू, आलिशान कारच्या विक्रीवर पुढील वर्षापर्यंत बंदी
घातली आहे. वृत्तसंंस्था