संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची स्थिती हलाखीची असून माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांना वीज, गॅसचे बिल अडीच लाख रुपयांहून अधिक रकमेचे आले आहे. 'द नेशन'ने दिलेल्या माहितीनुसार, अहमद यांनी दावा केला आहे की ते बाहेर नाश्ता करतात, फक्त एकदाच गॅसवर अन्न शिजवतात. तसेच ते एसी वापरत नाहीत तरीही एवढे अवाढ्यव्य आलेल्या बिलाने आपणाला खूप धक्का बसला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे दरोडेखोर, डाकू असे वर्णन करत ते म्हणाले की, ते देशाच्या हितासाठी नाही तर त्यांच्यावरील गुन्हेगारी खटले रद्द करण्यासाठी परत आले आहेत. महागाईने लोकांना हलाखीच्या स्थितीत नेले आहे. लोकांकडे कब्रसाठीही पैसे नाहीत. लोकांनी स्मशानभूमीत पोस्टर लावली आहेत की कबरीसाठी आम्हाला पैसे द्या. आज देशातील कोणत्याही आईला आपल्या मुलाने उपाशीपोटी शाळेत जावे असे वाटत नाही. आपला देश बुडत आहे. सध्या देशात असे सरकार आहे जे लोकांना मरायला सोडत आहे. शाहबाज सरकारचे स्थितीवरील नियंत्रण सुटले आहे.
शाहबाज सरकारला इशारा देताना ते म्हणाले की, वेळ कोणाच्याही बाजूने नाही. देशात महागाईविरोधात क्रांती सुरू झाली आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आपली अर्थव्यवस्था सतत ढासळत चालली आहे. आता महागाईविरुद्धचा जगण्याचा लढा झाला आहे. मी सरकारला इशारा देतो की डोळे उघडा आणि गरिबांना मरण्यापासून वाचवा.
पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती सतत गगनाला भिडत आहेत. १ किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत ७० पाकिस्तानी रुपये आहे. भारतात ते ५६ रुपये आहे. तेथे १ किलो पिठाची किंमत ७५ रुपये आहे. भारतात त्याची किंमत २५ रुपये आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत २५८ रुपये आहे, तर भारतात १०० रुपये आहे.