पाकिस्तानचे फाजील लाड बंद करणार
#वॉशिंग्टन
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे प्रशासन जगासाठी डोकेदुखी बनलेल्या पाकिस्तानला आर्थिक व लष्करी मदत का करत आहे, असा सवाल उपस्थित करत निक्की हेली यांनी, राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर आपण प्रथम पाकिस्तानचे हे लाड तत्काळ बंद करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून सध्या त्या देशभरात प्रचार आणि संपर्क अभियान राबवत आहेत. या अभियानादरम्यान हेली या अर्थकारण, परराष्ट्र धोरण, शिक्षण अशा अनेक धोरणात्मक विषयावरील आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. जगासाठी डोकेदुखी बनलेल्या, जागतिक शांततेत अडसर ठरलेल्या पाकिस्तान सरकारला ज्यो बायडेन यांचे प्रशासन लष्करी आणि आर्थिक मदत का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा पाकिस्तानचे हे फाजील लाड बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या हितसंबंधांत बाधा आणणाऱ्या पाकिस्तानची मदत करणे अमेरिकेने थांबवले होते. मात्र बायडेन यांनी पुन्हा पाकिस्तानला लष्करी मदत करणे सुरू केले आहे. बायडेन प्रशासन पर्यावरण संवर्धनासाठी चीनला निधी देत आहे, हा निधी अमेरिकन करदात्यांच्या खिशातून दिला जातो, हा अमेरिकन नागरिकांचा अपमान आहे. चीन अमेरिकेला किती पाण्यात पाहतो, हे ठावूक असतानाही चीनला ही मदत का केली जाते आहे, असा संतप्त सवालही हेली यांनी उपस्थित केला.
वृत्तसंंस्था