पाकिस्तान सरकार कचाट्यात
#इस्लामाबाद
निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणा करत सुटलेले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार आता कोंडीत सापडले आहे. आपल्याला विचारल्याशिवाय सरकारने कसलेच अनुदान जाहीर करायचे नाही, अशी अट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तान सरकारसमोर ठेवली आहे. या अटीचे पालन झाले तरच कर्जाचा पहिला हप्ता दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात नागरी संघर्ष सुरू आहे. इम्रान खान यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. अशा अवस्थेत पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर शाहबाज यांच्या सरकारला अनुदान जाहीर करणे अनिवार्य आहे. जर अनुदान जाहीर केले नाही तर निवडणुकीत पक्षाचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. अनुदान द्यावे तर पाकिस्तानला कर्ज मिळणार नाही. मागच्या जानेवारी महिन्यापासून पाकिस्तान सरकार आयएमएफकडे नव्या कर्जासाठी विनवणी करत आहे. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करत आहेत. आयएमएफ पाकिस्तानला १.१ अब्ज डॉलरचे कर्ज देणार आहे. याशिवाय आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानने चीन, सौदी अरब या मित्र देशांकडून कर्ज घ्यावे, असा सल्ला आयएमएफने दिला आहे.