...अन्यथा जपान नामशेष होईल
#टोकियो
घटत्या लोकसंख्येमुळे जपान चिंतेत असून लोकसंख्यावाढीसाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जन्मदरातील घट रोखण्यात अपयश आले तर एक दिवस जपान पृथ्वीतलावरून नामशेष होईल, असा इशारा पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे सल्लागार मसाको मोरी यांनी दिला आहे.
जपानमधील जन्मदराचे प्रमाण कमी आहे. त्यात मृत्युदर मात्र झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे लोकसंख्या घटली आहे. याचा परिणाम जपानच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे सल्लागार मसाको मोरी यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. जन्मदरात अशीच घट होत राहिली तर एक दिवस जपानचे नावही शिल्लक राहणार नाही.
२०२२ साली जपानचा जन्मदर आणि मृत्युदरात मोठी तफावत दिसून आली होती. जन्मदरापेक्षा मृत्युदर दुप्पट असल्यामुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. या एकाच वर्षात देशात ८ लाखांहून कमी बालकांचा जन्म झाल्याची नोंद करण्यात आली. तर या वर्षात १५ लाख लोक मृत्युमुखी पडल्याची नोंद सरकारदरबारी करण्यात आली. विशेष म्हणजे जपानच्या लोकसंख्येत ६५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. थोडक्यात जपानमध्ये अनुत्पादक घटक जास्त आहे. लोकसंख्यावाढ आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या जपानमध्ये कमी आहे.
अनुत्पादक घटकांचे प्रमाण जास्त
२०२३ मध्ये ६५ वर्षांहून जास्त वयाच्या लोकांची संख्या जपानमध्ये २९ टक्क्यांनी वाढली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला, राज्यकारभाराला आणि एकूण व्यवस्थेला चालना देणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या जपानमध्ये कमी होत चालली आहे, यामुळे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे सल्लागार मसाको मोरी यांनी फेब्रुवारीत चिंता व्यक्त केली होती. केवळ जपानच नव्हे तर चीनमध्येही सक्षम आणि सक्रिय वयोगटातील लोकांची संख्या घटत चालली आहे. चीनने लोकसंख्यावाढीसाठी प्रोत्साहन मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. याच धर्तीवर आता जपाननेही लोकसंख्यावाढीसाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असा आग्रह पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे सल्लागार मसाको मोरी यांनी धरला आहे.
वृत्तसंंस्था