मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेच्या संयोजकांनी टॉपलेस केल्याचा आरोप
#जाकार्ता
मुस्लीम बहुल असलेल्या इंडोनेशियामध्ये मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या स्पर्धकांमधील सहा तरुणींना आयोजकांनी टॉपलेस केल्याचा आरोप स्पर्धकांनी केला आहे. संबंधित स्पर्धकांनी पोलीस आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे तक्रार केली असून पोलिसांनीही याबाबत काही पुरावे मिळाल्याचे मान्य केले आहे. या आरोपामुळे देशात खळबळ माजली आहे. अतिशय संवेदनशील अशा या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ही सौंदर्य स्पर्धा झाली. यातील सहभागी स्पर्धकांपैकी सहा तरुणींचा असा आरोप आहे की, त्यांना एका वेगळ्या खोलीत नेण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या २० लोकांसमोर त्यांना टॉपलेस होण्यास सांगितले. यावेळी त्यांची छायाचित्रे काढण्यात आली आणि त्याचा व्हीडीओ बनवण्यात आला.
हे आरोप प्रकाशात आल्यानंतर इंडोनेशियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २८ कोटी आहे. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला चौथ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच इंडोनेशियामध्ये जगात सर्वाधिक मुस्लिमांचे वास्तव्य आहे.
इंडोनेशियन माध्यमांनी असे म्हटले आहे की, आयोजकांनी शारीरिक तपासणीचा बहाणा म्हणून या तरुणींना वेगळे काढले. त्यांना टॉपलेस झाल्यावर तपासणी करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना वेगळ्या खोलीत नेण्यात आले. येथे २० लोक अगोदरच उपस्थित होते. त्यातील बहुतेक पुरुष होते. आत गेल्यानंतर पाच तरुणींना एकाच वेळी टॉपलेस होण्यास सांगितले. टॉपलेस झाल्यावर आयोजकांनी त्यांचे फोटो काढले. त्या खोलीत उपस्थित असलेल्या एका महिलेनेही याला दुजोरा दिला आहे. आता ही छायाचित्रे काही मीडिया हाऊसच्या हाती लागली असून, चेहरा अस्पष्ट करून ती प्रसिद्धही करण्यात आली आहेत.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका वृत्तसंस्थेला कार्यक्रमाच्या आयोजकांचे उत्तर जाणून घ्यायचे होते. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. इंडोनेशियन कंपनी पीटी कपेलाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या संस्थापकाचे नाव पोपी कपेला आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटनेनेही सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. एका वृत्तानुसार संघटना या प्रकरणाची चौकशी करत आहे.
वृत्तसंस्था