फ्रान्समध्ये पेन्शन कायद्यातील सुधारणेला विरोध कायम
#पॅरिस
फ्रान्समध्ये सेवानिवृत्ती विधेयकातील सुधारणेवरून सरकारी कर्मचारी नाराज आहेत. मागच्या दोन महिन्यांपासून कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी पॅरिसच्या रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आंदोलकांशी या मुद्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कामगार संघटना माघार घ्यायला तयार नाहीत. सोमवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशी (१ मे) पॅरिसमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात १५० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून ४०० आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
निवृत्ती कायद्यात सुधारणा करण्यात येऊ नये यासाठी कामगार संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत. या आंदोलनादरम्यान सोमवारी हिंसाचार झाला आहे. या घटनेत १५० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी ४०० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती फ्रान्सचे मंत्री जेराल्ड डर्मेनिन यांनी दिली.
निवृत्ती कायद्यातील संभाव्य बदलांचे महत्त्व कामगारांच्या गळी उतरवण्यात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना सातत्याने अपयश येत आहे. देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठीच हे बदल आवश्यक असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. नव्या कायद्यानुसार निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ वर्ष करण्याचा निर्णय मॅक्रॉन सरकारने घेतला आहे. मात्र, निर्णयाला कामगारांकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी कामगार दिनाच्या निमित्ताने स्थानिक कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी एक लाख कामगार रस्त्यावर उतरले होते. कामगारांनी केलेल्या दगडफेकीत १५० पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून कामगारांना पांगवण्याचा प्रयत्न केला. कामगार दिनी कामगारांनी असा हिंसाचार करणे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी व्यक्त केली आहे.