'वन ऑटोग्राफ प्लिज'
#हिरोशिमा
एखाद्या सिनेनटाला त्याचे चाहते गराडा घालतात, त्याची स्वाक्षरी मागतात आणि त्याच्यासोबत एक सेल्फी काढतात, हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र एखाद्या देशाच्या प्रमुखाला दुसऱ्या देशाच्या प्रमुखाने अशी स्वाक्षरी मागितली तर आश्चर्य व्यक्त केले जाणार. असाच काहीसा प्रकार जी-७ परिषदेस हजर राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत घडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मोदींना एक स्वाक्षरी देण्याची मागणी करत त्यांच्या लोकप्रियतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
हिरोशिमा या शहरात ही शिखर परिषद होत आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना भेटत आहेत. याचवेळी त्यांनी क्वाड संमेलनालाही हजेरी लावली. तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील उपस्थित होते. दरम्यान बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
काय म्हणाले बायडन ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींच्या जवळ आले आणि म्हणाले की, मी सध्या एका विचित्र परिस्थितीला सामोरे जात आहे. तुम्ही प्रचंड लोकप्रिय नेते आहात, मात्र तुमची लोकप्रियता माझ्यासाठी समस्या बनली आहे. पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी आयोजित स्नेहभोजनात यायला आमच्या देशातील प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यासाठी अमेरिकेच्या प्रत्येक शहरातून-गावातून लोक येऊ इच्छित आहेत. पण आता त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे माझ्याकडचे पास संपले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, मी तुमची चेष्टा करतोय, पण हवे तर माझ्या टीमला विचारा. मला अशाही लोकांचे फोन येत आहेत, ज्यांचे याआधी मी नावही ऐकलेले नाही. कलाकारांपासून ते माझ्या नातेवाईकांपर्यंत लोकांचे मला फोन येत आहेत. त्यांना या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. खरे म्हणजे त्यांना तुम्हाला जवळून बघायचे. अमेरिकेत तुम्ही एवढे लोकप्रिय आहात, याची मला कल्पना नव्हती. तुम्ही अमेरिकन लोकांवरही प्रभाव टाकला आहे. तुमची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या, असे बायडन म्हणाले आहेत. दरम्यान हिरोशिमामधील या घटनेची सध्या जागतिक पातळीवर चर्चा होताना दिसत आहे.
वृत्तसंस्था