शंभू बॉर्डरवर पुन्हा गोंधळ
#अंबाला
पंजाबच्या शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. १६) शंभू सीमेवर पुन्हा गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी बॅरिकेडिंगकडे जाण्याचा प्रयत्न केला असता हरियाणा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अंगावर शेल फुटल्याने अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, अंबाला येथे तैनात जीआरपीचे एसआय हिरालाल यांचा मृत्यू झाला. अश्रूधुराच्या गोळ्यांमुळे अनेकांचा श्वास गुदमरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा आणि मजदूर संघाने शुक्रवारी ग्रामीण भारत बंद पुकारला आहे. यामध्ये गावोगावी दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेतात कामे करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरियाणा, पंजाब आणि हिमाचलमध्ये बाजारपेठा बंद आहेत. रोडवेजच्या बसेस धावत नाहीत. राजस्थानमधील हनुमानगड आणि श्रीगंगानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बंदचा परिणाम होत आहे. बीकेयू कामगारांनी हरियाणातील अनेक टोलनाके दुपारी मोकळे केले.
हरियाणा-पंजाबच्या (पंजाबसाठी खनौरी सीमा) दातासिंगवाला सीमेवर पोलिसांशी झटापट आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी भारतीय किसान नौजवान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिमन्यू कोहर यांच्यासह ६ शेतकऱ्यांवर जिंदच्या गढी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे. त्यांच्यावर कलम १४४चे उल्लंघन, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, तोडफोड करणे आदी कलमे लावण्यात आली आहेत. त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणी सोनीपत जिल्ह्यातील कथुरा गावचा रहिवासी अक्षय नरवाल, रोहतक जिल्ह्यातील मदिना गावचा रहिवासी प्रवीण, कोयल गावचा रहिवासी वीरेंद्र यांना अटक केली आहे.
हरियाणात तीन वाजल्यानंतर शेतकरी टोल प्लाझावरुन परतायला लागले आहेत. पंचकुलाच्या चंडी मंदिर टोलवर पुन्हा वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. शंभू सीमेवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बीकेयूने (चाधुनी गट) दुपारी १२ ते ३ या वेळेत टोल फ्रीची घोषणा केली होती.
चर्चेची तिसरी फेरीही निर्णयाविना
चंदीगड येथे शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये गुरुवारी (दि. १५) झालेली चर्चेची तिसरी फेरीही अनिर्णित राहिली. रात्री उशिरा सुमारे साडेपाच तास ही बैठक चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने एमएसपीवर कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामध्ये शेतकरी आणि सरकार या दोघांचे प्रतिनिधी असतील. एमएसपी हमीभावावर शेतकरी नेते ठाम राहिले. या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयूष गोयल, नित्यानंद राय यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित होते. आता रविवारी (दि. १८) रोजी सायंकाळी ६ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. तोपर्यंत दोन्ही बाजूंनी शांतता राखण्याचे आश्वासन दिले आहे.