संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानची राम मंदिरावरून आदळआपट
#वॉशिंग्टन
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी अयोध्येतील राम मंदिर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केले. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.
संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारताची खडाजंगी झाली. संपूर्ण जग प्रगती करत असताना पाकिस्तान केवळ भारतविरोध या एकाच मुद्द्यावर अडकला असल्याचा टोला भारताने लगावला.
पाकिस्तानने १९३ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या आमभेत 'इस्लामफोबियाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना' हा ठराव नुकताच मांडला होता. ठरावाच्या बाजुने ११५ देशांनी मतदान केले. भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली, युक्रेन आणि ब्रिटनसह ४४ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. बाजूने ११५ मते पडल्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात काही टिप्पण्या केल्या होत्या. त्यावर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'शिष्टमंडळ आणि त्याने केलेल्या टिप्पण्यांबाबत एवढेच म्हणता येईल की, हे पूर्ण खोटे आहे. संपूर्ण जग प्रगती करत असताना पाकिस्तान फक्त एकाच मुद्द्यावर अडकला आहे.
आपल्या भाषणात अक्रम यांनी अयोध्येतील राम मंदिर अभिषेक तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीचाही उल्लेख केला होता. कंबोज म्हणाल्या, 'माझ्या देशाशी संबंधित विषयांवर या शिष्टमंडळाचा मर्यादित आणि चुकीचा दृष्टीकोन पाहणे खरोखरच दुर्दैवी आहे, विशेषत: जेव्हा सर्वसाधारण सभेने ज्ञान, सखोलता आणि जागतिक दृष्टीकोनातून या विषयावर विचार केला. कदाचित या शिष्टमंडळाला त्याची माहिती नसेल.वृत्तसंस्था