आता हिंसाचाराला बसणार चाप
#वॉशिंग्टन
अमेरिकेत अंधाधुंद गोळीबाराच्या घटना नव्या राहिल्या नाहीत. अलीकडील काळात शाळा-महाविद्यालयात अशा फायरिंगच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. शस्त्र बाळगण्याचा अधिकार अमेरिकन लोकांच्या मूलभूत अधिकारात समाविष्ट आहे. त्यामुळे शास्त्र बाळगणाऱयांचे आणि त्यांच्या दुरुपयोगांचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१४ मार्च) राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार शस्त्र खरेदी करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे.
या नव्या अध्यादेशानुसार, शस्त्र विक्री करण्यापूर्वी शस्त्र खरेदी करणाऱ्याचा इतिहास तपासला जाणार आहे. त्याच्यावर आधी काही गुन्हे दाखल आहेत का? त्याने शास्त्र बाळगण्याच्या अधिकाराचा कधी दुरुपयोग केला आहे काय, हे पाहिले जाणार आहे. त्यामुळे शस्त्र विक्री करताना ते चुकीच्या व्यक्तीच्या हाती जात नाही ना याची खबरदारी घेतली जाणार आहे.
अमेरिकेत स्वसंरक्षणासाठी नागरिकाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेने नागरिकांना जे मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत, त्यातील हा महत्त्वाचा अधिकार मानला जातो. आजवर सात राष्ट्राध्यक्षांच्या हत्या झालेल्या आहेत. विल्यम हॅरिसन, झेड टेलर, अब्राहिम लिंकन, जेम्स गारफिल्ड, विल्यम मॅकिन्ले वॉरेन हार्डिंग, फ्रँकलिन रुझवेल्ट आणि जॉन केनेडी अशा राष्ट्राध्यक्षांना या मूलभूत अधिकाराचा फटका बसलेला आहे. असे असतानाही अमेरिकेने नागरिकांचा शस्त्र बाळगण्याचा अधिकार रद्द केलेला नाही. मात्र अलीकडील काळात नागरी समाजात या मूलभूत अधिकाराचा गैरवापर करत हिंसाचार घडवण्याच्या घटना
वाढल्या आहेत.
काय म्हणाले बायडेन ?
या अध्यादेशावर स्वाक्षरी करताना बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंदूक विकत घेणारी व्यक्ती तिचा वापर दहशत पसरवण्यासाठी करणार आहे का कौटुंबिक हिंसाचारासाठी करणार आहे, याची तपसाणी करून, त्याबाबतची खातरजमा केली जाणार आहे.
मागच्या वर्षी बायडेन यांनी शस्त्र सुरक्षा कायद्यातील सुधारणेचा कायदा पारित केला आहे. बायडेन यांनी आपल्या कार्यकाळात हिंसाचार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. वृत्तसंस्था