आता अमेरिकेतही दिवाळी धूमधडाक्यात!
#पेनसिल्व्हेनिया
भारताप्रमाणेच आता अमेरिकेतही दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. पेनसिल्व्हेनिया राज्याने हा सण साजरा करण्यासाठी अधिकृत सुट्टी जाहीर आहे. भारतासह जगभरात दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जात. मागील वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली होती. आता दिवाळीची लोकप्रियता पाहून, पेनसिल्व्हेनिया याने दिवाळीचा दिवसाला राष्ट्रीय सुट्टी घोषित केली आहे. सिनेटर निकिल सावल यांनी याबाबत ट्वीट करुन ही माहिती दिली.
आपल्या ट्विटमध्ये निकिल सावल म्हणतात, ‘‘सिनेटने दिवाळीला अधिकृत सुट्टी म्हणून मान्यता देण्यासाठी एकमताने मतदान केलं. प्रकाशाचा हा सण साजरा करणार्या सर्व पेनसिल्व्हेनियन नागरिकांचे अभिनंदन!’’ पेनसिल्व्हेनियामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त दक्षिण आशियाई लोक राहतात. त्यापैकी मोठ्या संख्येने दिवाळी साजरी करतात. त्यांच्यासोबत हजारो पेनसिल्व्हेनियन लोक दरवर्षी या प्रकाशाच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सामिल होतात. मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि समुदायिक केंद्रांमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी केली जाते.
पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर ग्रेग रॉथमन आणि सिनेटर निकिल सावल यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यासाठीचं विधेयक मांडलं होतं. ज्यावर एकमताने मतदान झालं आणि दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली. हे विधेयक मांडण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याबद्दल सावल यांनी रॉथमन यांचे विशेष आभार मानले आहेत.
‘‘हा आनंदाचा दिवस आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला दिवाळीला अधिकृत सुट्टी देण्याचा कायदा सिनेटने नुकताच ५०-० असा एकमताने पास केला. राज्याने आपल्या राष्ट्रकुलाची समृद्ध सांस्कृतिक विविधता जपली आहे,’’ असं रॉथमन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेत दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. व्हाईट हाऊसमध्येही तो साजरा केला जातो. गेल्या वर्षी, जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दिवाळी सोहळ्याचे आयोजन केले होते.
वृत्तसंस्था