प्रिटी नव्हे तर सुपरवूमन!
#मेक्सिको
कामावरून एका दिवसाची सुट्टी मिळाली की सगळेच कर्मचारी सुटकेचा श्वास सोडतात. मात्र काहींना त्यांच्या कामाबाबत एवढा आदर असतो की ते त्यांच्या कामाला वर्षाचे बारा महिने आणि चोवीस तास देतात. लोक ५५-६० व्या वर्षी साधारणत: निवृत्ती घेतात. मात्र एका महिलेने ७४ वर्षांच्या नोकरीत एकही सुट्टी न घेता काम करत तिच्या उत्तम कामाचा पुरावाच जणू दिला आहे.
टेक्सासमधील एका ९० वर्षाच्या महिलेने ७४ वर्षांच्या नोकरीत एकदाही सुट्टी न घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. मेल्बा मेबेन या अलीकडेच 'डिलार्ड' च्या डिपार्टमेंटल स्टोअरमधून एका दिवसाचीही सुट्टी न घेता काम करत होत्या. नोकरीच्या संपूर्ण प्रवासात त्या सुट्टी न घेता निवृत्त झाल्या आहेत. दुकानाच्या व्यवस्थापकाने मिस मेबेनला आईचा दर्जा दिला होता. त्यांची कामाची पद्धत संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आदर्श मानली जाते. टायलर शहरातील 'डिलार्ड स्टोअर' चे व्यवस्थापक जेम्स सेन्जने सांगितले की, ते मिस मेबेनला ६५ वर्षांपासून ओळखतात. त्यांनी प्रत्येक ग्राहकांना समाधानापेक्षा जास्त सुखद अनुभव दिला आहे. त्या प्रत्येक जबाबदारी घ्यायच्या. त्यांनी स्टोअरमधील अनेक महिलांना प्रशिक्षण दिले आणि उत्तम कर्मचारी बनवले. निवृत्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना मिस मेबेन म्हणाल्या की, माझ्यासाठी स्टोअरमधला प्रत्येक दिवस हा आनंदाचा आणि समाधानाचा होता. आता सेवानिवृत्त झाल्यावर मिस मेबेन जगाच्या सफरीवर जाण्याचे आणि आवडते खाद्यपदार्थ बनवण्याचे बेत आखत आहेत. त्यांच्या नोकरीतील दिवसांच्या उत्तम कार्याचे कौतुक करण्यासाठी एका मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.