केवळ बोलतच नाही करूनही दाखवतो
#सेऊल
कोरियन द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित करण्याच्या निमित्ताने उत्तर आणि दक्षिण कोरियातील संघर्षाला खतपाणी घालणाऱ्या अमेरिकेला बुधवारी उत्तर कोरियाने चांगलाच दणका दिला आहे. दक्षिण कोरियासोबत संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या 'केंचुकी' या आण्विक पाणबुडीजवळ दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत. यापूर्वी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी अनेक वेळा अमेरिकेच्या या कारवायांविरोधात धमक्या दिल्या आहेत. मात्र आता अमेरिकेच्या पाणबुडीजवळ क्षेपणास्त्राचा मारा करून आपली युद्धाची तयारी असल्याचा संदेशही दिला आहे.
अमेरिकेने गेल्या ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच दक्षिण कोरियाजवळ आपली आण्विक पाणबुडी नेली आहे. या पाणबुडीत आंतरखंडीय क्षेपणास्त्र ठेवलेले आहे. दक्षिण कोरियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ही पाणबुडी पोहोचताच उत्तर कोरियाने दोन क्षेपणास्त्रे सोडली. यामुळे या क्षेत्रात तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावरून बुधवारी (१९ जुलै) पहाटे साडेतीन आणि पावणेचारच्या सुमारास जवळच्या टप्प्यात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मारा केला. ही दोन्ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीपासून ५५० किलोमीटर अंतरावर पडली. दक्षिण कोरियामधील वृत्तसंस्थांनी याबाबत माहिती दिली.
दक्षिण कोरियाने केला निषेध
दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. या हल्ल्याचा तीव्र निषेधही त्यांनी केला. उत्तर कोरियाने केलेले हे कृत्य चिथावणीखोर आहे. केवळ कोरियन द्वीपकल्पच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांततेला हानी पोहोचवणारे हे कृत्य आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे हे स्पष्ट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.