संग्रहित छायाचित्र
#शांघाय
तैवानशी संघर्षात पराभव झाला तरी चीन अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असे आश्वासन चीनने अमेरिकेला दिले आहे. ५० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमध्ये अण्वस्त्रांवर चर्चा झाली. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनमधील चर्चा या वर्षी मार्चमध्ये होणार होती. या द्विपक्षीय चर्चेचा योग आता आला असून शांघायमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली.
दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेवेळी चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर चीन आणि तैवानमध्ये युद्ध झाले तर चीन अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. या युद्धात चीनचा पराभव झाला तरी तो अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. अमेरिकी अधिकारी डेव्हिड सँटोरो म्हणाले की, चिनी अधिकाऱ्यांना विश्वास आहे की ते अण्वस्त्रांचा वापर न करताही तैवानला पराभूत करू शकतात. दुसऱ्या बाजूला चीनच्या आश्वासनावर आपला विश्वास नसल्याचे तैवानने स्पष्ट केले आहे. शांघायमध्ये दोन दिवस ही बैठक झाली. बैठकीत अमेरिकेच्या अर्धा डझन अधिकाऱ्यांनी चीनसमोर आपली बाजू मांडली. त्यात माजी अधिकारी, अभ्यासकांचा समावेश होता. चीनच्या बाजूने माजी लष्करी अधिकारी, अभ्यासक आणि विश्लेषकांचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते.
अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, ही चर्चा अधिकृत चर्चेची जागा घेऊ शकत नाही. दोन्ही देशांमधील चर्चा अशा वेळी घडली जेव्हा त्यांच्यात आर्थिक आणि भू-राजकारणावरून तणाव आहे. त्यांनी परस्परांवर पक्षपाती वागण्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, चीनने २०२१ ते २०२३ दरम्यान आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येत २० टक्के वाढ केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गेल्या वर्षी चीनकडे ५०० वापरता येण्याजोगी अण्वस्त्रे असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. २०३० पर्यंत त्यांच्याकडे हजार अण्वस्त्रे असतील.
तैवान आणि चीनमधील सध्याचा संघर्ष दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला. वास्तविक, तेव्हा चीनमध्ये राष्ट्रवादी सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पक्षात गृहयुद्ध सुरू होते. १९४८ मध्ये कम्युनिस्टांचा विजय झाला आणि त्यांचे नेते माओ झेडोंग यांनी मुख्य भूप्रदेश चीनची राजधानी बीजिंग ताब्यात घेतली. पराभवानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते कुओमिंतांग तैवानला पळून गेले. तेव्हापासून, कुओमिंतांग हा तैवानमधील सर्वात प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याने बहुतेक काळ तैवानवर राज्य केले आहे. सध्या केवळ १४ देश तैवानला सार्वभौम देश म्हणून मान्यता देतात. तैवानला पाठिंबा देऊनही अमेरिका त्याला स्वतंत्र देश मानत नाही. तैवानला मान्यता देऊ नये, यासाठी चीन इतर देशांवर राजनैतिक दबाव टाकत आहे. सध्याचे चीन आणि तैवानमधील संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. चीन-तैवान वादाची सुरुवात १ ऑक्टोबर २०२२ रोजी चीनच्या राष्ट्रीय दिनावेळी झाली. त्यावेळी १०० हून अधिक चिनी विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्राचे उल्लंघन केले. चीनच्या या कारवाईची जगभरात चर्चा सुरू झाली. चीन तैवानवर जबरदस्तीने कब्जा करणार अशी चर्चा होती. फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि चीनने रशियाला दिलेला पाठिंबा यामुळे तैवानवर हल्ला करण्याची भीती आणखी वाढली आहे.