खलिस्तानी पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ता अमेरिकेच्या ताब्यात
वॉशिंग्टन : अमेरिकेतील खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता नावाच्या एका भारतीय नागरिकावर आरोप करण्यात आले होते. हा कट निखिल गुप्ताच्या मदतीने भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ ने रचल्याचा आरोप वॉशिंग्टन पोस्टने काही महिन्यांपूर्वी केला होता. निखिल गुप्ताला गेल्या वर्षी चेक रिपब्लिकमध्ये अटकही करण्यात आली होती. दरम्यान आता त्याला चेक रिपब्लिकमधून अमेरिकेत आणण्यात आलं आहे. (Nikhil Gupta)
५२ वर्षीय निखिल गुप्तावर अमेरिकेतील खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला चेक रिपब्लिकमध्ये अटक झाल्यावर अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. या मागणीला निखिल गुप्ताने विरोधही केला होता. मात्र, चेक रिपब्लिक सरकारने त्याची याचिका फेटाळून लावली. आता निखिल गुप्ताला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्याला सोमवारी अमेरिकेतील फेडरल न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन हे भारत दौऱ्यावर असताना ही घटना समोर आली आहे. सुलिव्हन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट रॉच्या अधिकार्याने रचला होता, असा आरोप काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते. निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाने सीसी-१ (चीफ कॉन्स्पिरेटर) नावाच्या भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हे काम केले होते, असे आरोपपत्रात म्हटलं होतं. तसेच विक्रम यादव आणि गुप्ता यांनी ऑनलाइन संभाषण करून पन्नूच्या हत्येची योजना आखली. योजनेदरम्यान ते एका ड्रग्स आणि शस्त्राच्या व्यापार्याकडे पोहोचले होते, असा दावाही आरोपपत्रात केला होता.