नवाझ शरीफ सत्तेसाठी अन्य पक्षांशी तडजोड करणार
#इस्लामाबाद
पाकिस्तानच्या जनतेने स्पष्ट निकाल दिलेला नसल्याने संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सरकार स्थापनेबाबत अद्याप गोंधळाची स्थिती आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ गटाचे प्रमुख नवाझ शरीफ पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. शरीफ यांच्या पक्षाने पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुत्ताहिदा कामी मूव्हमेंट-पाकिस्तान यांच्यासोबत सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू केल्या आहेत.राजकीय निरीक्षकांच्या मतानुसार नवाझ शरीफ हे पंतप्रधानपद आपल्याकडे ठेवतील तर राष्ट्रपती, संसद अध्यक्षपद सहयोगी पक्षांसाठी सोडतील यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे कळते. पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान आणि निकालादरम्यान अशांततेची स्थिती होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी दरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे लष्कर तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले नवाझ शरीफ यांच्या समर्थनात आहे. माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान जनतेला बदल हवाय असं यातून सूचित होत असल्याचा इम्रान समर्थकांचा दावा आहे.अंतिम निकालामध्ये इम्रान यांच्या पक्षाचे समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांना ९७ जागा जिंकता आल्या आहेत. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ७६ जागांवर विजय मिळवलाय. तसेच, पाकिस्तान पीपल्स पार्टीने ५४ जागा जिंकल्या आहेत. १७ जागा मुत्ताहिदा कामी मूव्हमेंट-पाकिस्तानला मिळाल्या आहेत.
इम्रान खान यांच्या पक्षाच्या दाव्यानुसार, जवळपास १८ जागांमध्ये फेरफार झाला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे. खान यांनी यूके आणि यूएसएमधील समर्थकांना आवाहन केलंय की त्यांनी निवडणुकीतील फसवणुकीबाबत आवाज उठवावा.इम्रान खान यांच्या समर्थकांनी देशात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे लष्कराला बळाचा वापर करावा लागत आहे. लोकांच्या एका ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी आणण्यात आली आहे. काही ठिकाणी संघर्ष झाल्याच्या बातम्या मिळत आहेत.