चीनमध्ये निसर्गाचा हाहा:कार
#बीजिंग
चीनमध्ये मागच्या १४० वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूरस्थितीमुले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी बीजिंगमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून रेल्वे स्टेशन, विमानतळावर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५७ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
चीनमधील अनेक शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राजधानी बीजिंगसह अनेक मोठी शहरे पाण्याखाली गेली आहेत. १४० वर्षांपूर्वीही चीनने अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला होता. त्यानंतर आता चीनवर ही भीषण नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. राजधानी बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरु आहे.
मंगळवारी (१ ऑगस्ट) सकाळी ६ वाजेपर्यंत आणखी ३२ लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वादळामुळे उत्तर चीनमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून भीषण पूर आला आहे. बीजिंग हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,७४४.८ मिलीमीटर पावसामुळे वांगजियायुआन जलाशय भरले आहे. पावसामुळे आतापर्यंत २० जणांना जीव गमवावा लागला असून ३२ हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
पुरामुळे लाखो लोक बेघर
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व स्थानिक प्रशासनांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. बीजिंगमध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून, हेबेई प्रांतात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. चोंगकिंगमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. १२ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. लिओनिंगमध्ये पूरग्रस्त भागातून सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यापूर्वी १९९८ मध्ये चीनमध्ये भीषण पूर आला होता. ज्यामध्ये ४३०० लोकांचा मृत्यू झाला. यांगत्झी नदीच्या पुरामुळे बहुतेकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये हेनान प्रांतात आलेल्या पुरात ३२१ लोकांचा मृत्यू झाला होता.