निसर्गाने घडवला चमत्कार, ४० दिवसांनी सापडली अपघातग्रस्त मुले
#कोलंबिया
जगातील सर्वात जास्त पाऊस पाडणारे सर्वात मोठे, घनदाट अशा ॲमेझॉनच्या जंगलात १ मे रोजी एक छोटे विमान कोसळले होते. या विमानातून चार मुले, त्यांची आई आणि दोन वैमानिक प्रवास करत होते. या विमानाचा कोलंबियातील ॲमेझॉनच्या जंगलात अपघात झाला होता.
या विमान अपघातात मुलांची आई आणि दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता, पण अपघातानंतर ४० दिवसांनी ही मुले जिवंत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मुलांमध्ये १३, ९, ४ आणि १ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या मुलांचा अखेर पत्ता लागल्याने आणि ते जिवंत आढळल्याने कोलंबियाच्या अध्यक्षांनी आनंद व्यक्त केला असून ही बाब संपूर्ण देशासाठी आनंददायी घटना असल्याचे म्हटले आहे. या बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य राबवण्यात आले होते. यामध्ये डझनभर सैनिक आणि स्थानिक लोकांचा समावेश होता. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या मुलांच्या शोधानंतर आजचा दिवस हा 'मॅजिकल डे' असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही मुले एकटी होती पण त्यांनी जिवंत राहण्यासाठी केलेले प्रयत्न ही एक आश्चर्यकारक बाब असून ही घटना म्हणजे इतिहास बनल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ही मुले आता कोलंबियाची मुले बनल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रो यांनी बचाव कार्याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये सैनिक आणि स्थानिक लोक दिसताहेत जे या मुलांची काळजी घेताना दिसत आहेत. एक बचावकर्ता आपल्याकडील पाण्याच्या बाटलीतून एका चिमुकल्याला पाणी पाजताना दिसतो आहे, तर दुसरा एकजण दुसऱ्या एका मुलाला आपल्या हातातील भांड्यातून चमच्याच्या साहाय्याने जेवण भरवताना दिसतो आहे.
दरम्यान, कोलंबियाच्या संरक्षण खात्याने एक व्हीडीओ शेअर केला असून यामध्ये या चिमुकल्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उंचच उंच झाडांमधून एअरलिफ्ट करताना दिसत आहे. या मुलांना तातडीने वैद्यकीय मदतदेखील देण्यात आली. तसेच त्यांनी आपल्या आजोबांशी संवाददेखील साधला. जंगल मातेने त्यांना परत आणल्याचे सांगत त्यांच्या आजोबांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
'सेसना-२०६' या सिंगल इंजिन असलेल्या छोट्या विमानातून चार मुले आणि त्यांची आई प्रवास करत होते. ॲमेझाॅन प्रांतातील अराराकुआरा येथून सॅन जोसे डेल ग्वाविअरेकडे या विमानाने उड्डाण केले होते. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याबाबत ॲलर्ट जाहीर करण्यात आला होता. पण विमान काही मिनिटांनी ॲमेझॉनच्या जंगलात कोसळले होते. या अपघातानंतर तीन प्रौढांचे मृतदेह लष्कराला अपघातस्थळी सापडले होते, पण ही मुले दिसून आली नव्हती. पण ती बचावल्यानं मदत शोधण्यासाठी या पावसाच्या जंगलात भरकटली होती.