ऑस्ट्रेलियन समुद्र किनाऱ्यावर रहस्यमयी वस्तू
#कॅनबेरा
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ज्युरियन खाडीजवळील समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमय वस्तू सापडली आहे. ही वस्तू नेमकी काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक जण आपापल्या परीने अंदाज बांधत आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एखाद्या देशाच्या अंतराळ यानाचा भाग कोसळल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. सध्या रहस्यमयी वस्तूबद्दल संशोधन सुरू आहे. ऑस्ट्रेलियन अंतराळ संस्थेनं संशोधनाचे काम हाती घेत जगातील अन्य देशांच्या अंतराळ संस्थांकडे मदत मागितली आहे. ऑस्ट्रेलियन अंतराळ संस्थेने सोमवारी (१७ जुलै) ट्विटरवर रहस्यमयी वस्तूचा फोटो शेअर केला. 'आम्ही सध्या पश्चिम ऑस्ट्रेलियात ज्युरियन खाडीजवळच्या समुद्र किनाऱ्यावर या वस्तूसंदर्भात चौकशी, तपास करत आहोत. ही वस्तू एखाद्या परदेशी अंतराळ प्रक्षेपण यानाशी संबंधित असू शकते. आम्ही जागतिक समकक्षांशी संपर्क करत आहोत. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकेल,' असं ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेने ट्विटमध्ये नमूद केले आहे. कोणीही रहस्यमयी वस्तूला हात लावू नका, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेनं लोकांना दिला आहे. अशाच प्रकारची आणखी एखादी रहस्यमयी वस्तू दिसल्यास आम्हाला मेल करून माहिती द्या, असे आवाहनही संस्थेने केले आहे.
गेल्या शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या आकाशात कॉमेट/यूएफओ दिसल्याची चर्चा होती. मात्र तसे काही घडले नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चांद्रयान-३ दिसले होते. ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर रहस्यमय वस्तू सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले. याचा संबंध अनेकांनी इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेशी जोडला. इस्रोने गेल्याच आठवड्यात चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर सापडलेली वस्तू चांद्रयान अभियानाशी संबंधित असावी असा अनेकांचा अंदाज आहे. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून प्रत्येकजण कयास बांधत आहे.