म्यानमार सरकार झाले उदार, कैद्यांची शिक्षा माफ
#यांगून
म्यानमार येथील लष्करी राजवटीने नववर्षानिमित्त देशभरातील ३ हजारांहून अधिक कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. म्यानमारमध्ये नववर्षाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणाऱ्या या सणानिमित्त लष्करी राजवटीने शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. सोबतच विविध गुन्ह्यांसाठी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनाही मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्यानमार सरकार ३ हजारांपेक्षा अधिक कैद्यांना सोडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कायद्यामध्ये म्यानमारच्या लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात येणार आहे किंवा नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. सरकारने अशा राजकीय कार्यकर्त्यांनाही मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यास मानवाधिकार कार्यकर्त्या आंग सॅन सुकी यांचीही सुटका केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे
सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करपुरस्कृत स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन कौंसिलने सोमवारी ३११३ कैद्यांची मुक्तता करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यातील ९८ विदेशी कैद्यांना त्यांच्या मायदेशात रवाना केले जाणार आहे. नववर्षानिमित्त हा निर्णय घेतला आहे. मात्र या सोडण्यात येणाऱ्यात राजकीय कैद्यांचा समावेश आहे, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. म्यानमारच्या तुरुंगात एकूण १७,४६० कैदी राजकीय कार्यकर्ते आहेत. लोकशाही, मानवी हक्क अशा मुद्यांवर संघर्ष करत लष्करी राजवटीच्या एकाधिकारशाहीविरोधात आंदोलन करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची संख्या तुरुंगात सर्वाधिक आहे.वृत्तसंस्था