माझा फोन टॅप होत आहे
#कॅलिफोर्निया
काँग्रेस नेते राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी सिलिकॉन व्हॅलीमध्ये एआय क्षेत्रातील स्टार्टअप सुरू करणाऱ्या अनेक व्यावसायिकांची भेट घेतली. या दरम्यान, पेगासस स्पायवेअरवर चर्चा करताना, राहुल म्हणाले की, 'मला माहित आहे की, माझा फोन टॅप केला जात आहे. यानंतर त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले- हॅलो मोदीजी.'
या भेटीदरम्यान राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पोहोचले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, 'भारतात लोकशाहीवर युद्ध सुरू आहे. कोणतीही संस्था स्वबळावर काम करू शकत नाही. लोकशाही म्हणजे केवळ विरोधी पक्ष असणे असा नाही, तर लोकशाहीचा अर्थ म्हणजे संस्थांनी विरोधकांना साथ द्यावी, पण आपल्या देशातील संस्था दुसऱ्याच्या हातात आहेत.'
सिलिकॉन व्हॅली येथील प्लग अँड प्ले सभागृहात राहुल यांच्यासोबत आयओसीचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. राहुल म्हणाले की, 'देशात तंत्रज्ञानाचा विस्तार करायचा असेल, तर अशी व्यवस्था असली पाहिजे की, जिथे सत्ता कुणाकडे नाही तर सर्वांकडे असेल. भारतात डेटाच्या सुरक्षिततेबाबतही नियम बनवण्याची गरज आहे. मला वाटते की, माझा आयफोन टॅप केला जात आहे. जर एखाद्या देशाने ठरवले की, तुमचा फोन टॅप करायचा, तर ते बंद करता येणार नाही. मला असे वाटते की, मी जे काही करतो, त्याची सरकारला पूर्ण माहिती आहे.'
'देशात लोकशाहीवर युद्ध'
स्टॅनफोर्ड विद्यापीठात खासदारकी गेल्याबाबत राहुल म्हणाले की, 'मी २००४ मध्ये राजकारणात आलो. नुसते काही बोलून खासदारकी निघून जाऊ शकते, असे त्यावेळी वाटले नव्हते. अवमानाची इतकी मोठी शिक्षा मिळालेली मी कदाचित पहिलीच व्यक्ती आहे, पण आता मला वाटतं की संसदेत बसण्यापेक्षा मला जास्त संधी मिळेल. लोकशाहीतील संस्था धोक्यात आल्याचे पाहून आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली होती. १२५ लोकांपासून सुरू झालेला प्रवास लाखांपर्यंत पोहोचला. या यात्रेतून मी काय शिकलो, असे अनेकांनी मला विचारले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा अनुभव आहे. आम्ही लोकांना शेतीपासून ते आरोग्यसेवेपर्यंत शिक्षणापर्यंत सर्व गोष्टी सांगितल्या. आपल्या देशात राजकारण आणि सामान्य लोक यांच्यात खूप अंतर आहे.'
राहुल म्हणाले, 'सरकारकडे पोलिस, मीडिया यांसारख्या सर्व संस्था आहेत पण तरीही ते आम्हाला रोखू शकले नाहीत. काश्मीरच्या रस्त्यावर चाललात तर ४ दिवसांत मारले जाल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मी म्हणालो, ठीक आहे, काही हरकत नाही. महात्मा गांधीसुद्धा इंग्रजांविरुध्द एकटेच लढले होते.'
भारत-चीन संबंध
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील एका भारतीय विद्यार्थ्याने राहुल यांना विचारले की पुढील 5-10 वर्षांत भारत-चीन संबंध तुम्ही कुठे पाहता? यावर राहुल म्हणाले, 'दोन्ही देशांमधील संबंध कठीणच राहतील. त्यांनी आमचा काही भाग काबीज केला आहे. पण ते आमच्यावर दबाव आणू शकत नाहीत. त्याचवेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदी सरकारच्या धोरणांचे समर्थन केले. ते म्हणाले की, 'आमचे रशियाशी जुने संबंध आहेत. आपण काही बाबतीत त्याच्यावर अवलंबून आहोत. भारताला आपले हित अग्रस्थानी ठेवावे लागेल. एखाद्याशी संबंध सुधारल्यामुळे आपण इतरांशी बोलणे थांबवू शकत नाही. अशा परिस्थितीत सरकार युद्धाबाबत योग्य रणनीती अवलंबत आहे. मीही असेच केले असते.'