मुस्लीम देशांचे रशियाला समर्थन
#मॉस्को
रशिया-युक्रेन युद्धामुळे संतापलेल्या पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले असले तरी इस्लामिक देशांनी मात्र रशियाला समर्थन दिले असल्याचे चित्र समोर आले आहे. रशियाचे उपपंतप्रधान मरत खुस्नूलीन यांनी रविवारी याचा उल्लेख करत पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेवर टीका केली आहे. जगातील सर्व इस्लामिक देश रशियाच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रशिया आणि इस्लामिक देशांत या आठवड्यात एक सहकार्य करार करण्यात आला. 'रशिया- इस्लामिक वर्ल्ड फोरम' च्या माध्यमातून रशियाने मुस्लीम देशांसोबत व्यापार, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात शंभरपेक्षा अधिक सहकार्य करार केलेले आहेत. हा फोरम आमच्यासाठी राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांना चालना देणारे व्यासपीठ असल्याची भावना व्यक्त करत खुस्नूलीन यांनी, मुस्लीम देशांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केले आहे, अशी माहिती पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे. अमेरिका, जपान आणि युरोपियन देशांनी आमच्यावर आर्थिक निर्बंध लादले आहेत, मात्र एकाही मुस्लीम देशाने या निर्बंधांचे स्वागत केलेले नाही, याउलट आमच्यासोबत व्यापार करार करत आम्हाला पाठबळ दिले आहे, त्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेबाबत आम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही. रशियाने यापूर्वीही अशा आर्थिक कोंडीचा समर्थपणे सामना केला असल्याचेही खुस्नूलीन यांनी नमूद केले आहे.वृत्तसंस्था