मस्क म्हणतात, कमला हॅरिस खोटारड्या आहेत
वॉशिंग्टन : ‘एक्स’ आणि टेस्लाचे कर्तेधर्ते एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची संभावना खोटारड्या अशा शब्दात केली आहे. हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल खोटी विधाने केल्याचा त्यांचा आरोप आहे.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कमला हॅरिस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली होती की ट्रम्प देशात गर्भपातावर बंदी घालतील. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि आपण महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
हॅरिस यांनी पोस्टमध्ये अनेक लेखांचा समावेश केला असून त्यात ट्रम्प यांच्या विधानांचा समावेश होता. यामध्ये त्यांनी गर्भपातावर बंदी घालण्याबबातची विधाने केली होती. कमला हॅरिस यांच्या पोस्टला उत्तर देताना मस्क म्हणतात की, ट्रम्प यांनी २८ जूनच्या अध्यक्षीय चर्चेत गर्भपातावर बंदी घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकन राजकारण्यांना हे समजून घ्यावे लागेल की ते यापुढे ‘एक्स’ या व्यासपीठावर ते खोटी विधाने करू शकत नाहीत. आगामी अमेरिकन निवडणुकीत गर्भपात हा मोठा मुद्दा आहे. एकीकडे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विरोधात आहेत, तर दुसरीकडे बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा गर्भपाताला पाठिंबा आहे.
२४ जून २०२२ रोजी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ५० वर्षांपूर्वी महिलांना दिलेले गर्भपातासाठीचे घटनात्मक संरक्षण संपुष्टात आणले. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या निर्णयाचे दु:खद वर्णन केले. ते म्हणाले, न्यायालयाने जे केले ते कधीच घडले नाही. अमेरिकन महिलांचे आरोग्य आणि जीवन आता धोक्यात आले आहे. हा निर्णय अमेरिकेला १५० वर्षे मागे ढकलणार आहे. खरं तर,२०१८ मध्ये, मिसिसिपी राज्याने गंभीर वैद्यकीय आणीबाणी वगळता सर्व प्रकरणांमध्ये गर्भधारणेच्या १५ आठवड्यांनंतर गर्भपातावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला. चार वर्षांनंतर, सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना, मिसिसिपीचा निर्णय योग्य असल्याचे मान्य केले आणि संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी केली.