संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : जागतिक मंदीमुळे मागणी कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रीक वाहने तयार करणारी जगातील आघाडीची कंपनी टेस्लाने (Tesla) टेक्सास आणि कॅलिफोर्नियामधील ६ हजार ६२० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. वाहनांची मागणी घटल्याने आणि कंपनीच्या नफ्यात झालेल्या घसरणीमुळे दहा टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जातील असे कंपनीने सांगितले होते. अमेरिकेतील कामगार कायद्यानुसार, जर एखाद्या कंपनीने १०० किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले तर कर्मचाऱ्यांना ६० दिवस अगोदर कळवावे लागते. कंपनीने दिलेल्या नोटिशीमधून टेस्लाने कॅलिफोर्नियातील ३ हजार ३३२ आणि टेक्सासमधील २ हजार ६८८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे समोर आले आहे.
या कामगार कपातीची प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होणार आहे. टेक्सास युनिटमधील एकूण कर्मचारी संख्या १२ टक्क्याने कमी झाली आहे. तसेच, बफेलो न्यूयॉर्क युनिटमध्ये कार्यरत असणाऱ्या २८५ कर्मचाऱ्यांचाही कपातीमध्ये समावेश केला आहे.
टेस्लाने म्हटले आहे की, कंपनी वर्षाच्या अखेरीस विद्यमान कारखान्यात नवीन आणि अधिक परवडणारी वाहने बनवेल. याचा परिणाम असा होईल की पूर्वीच्या तुलनेत खर्च कमी होऊ शकेल आणि उत्पादित वाहनांची संख्या वाढू शकते. मंगळवारी आपल्या एक्स हँडलवर माहिती देताना टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क म्हणाले होते की, 'टेस्लाने आतापर्यंत कॅलिफोर्नियामध्ये ३० हजारांपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.'
आणखी कपात होऊ शकते
सध्याच्या आर्थिक अस्थिरतेचा गेल्या वर्षापर्यंत टेस्ला कंपनीवर कोणताही प्रभाव झाला नव्हता. या काळात कंपनीने अनेक नवीन कर्मचारी सातत्याने नियुक्त केले होते. २०२१ मध्ये टेस्लाच्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १ लाख होती. हीच कर्मचारी संख्या गेल्या वर्षी १ लाख ४० हजारांच्या पुढे गेली होती. आता कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कमी करणार आहे. याचा अर्थ टेस्लाच्या आणखी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत कर्मचारी कपातीचा सामना करावा लागू शकतो.
२०२० नंतर पहिल्यांदाच इलॉन मस्क यांच्या ईव्ही कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे टेस्लासमोर खडतर आव्हान निर्माण झाले आहे. अलीकडे, अनेक नवीन चिनी कंपन्यांनी या विभागात प्रवेश केला आहे. चीनच्या बीवायडीने विक्रीबाबतीत टेस्लाला मागे टाकले आहे.
भारत दौरा केला होता रद्द
विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मस्क हे भारतात येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी मोदी सरकार आणि उद्योगक्षेत्राने पायघड्या घातल्या होत्या. मस्क हे भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र, कंपनीसमोरील विपरीत स्थितीच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी आपला भारत दौरा अखेरच्या क्षणी रद्द केला होता. कंपनीच्या ढासळत्या स्थितीला प्राधान्य देण्यासाठी मस्क यांनी दौरा रद्द करण्याची घोषणा करताना आपण या वर्षांच्या अखेरीस नक्की भारताला भेट देऊ अशी ग्वाहीही दिली होती.