जगातील सर्वाधिक कोट्यधीश न्यूयॉर्कमध्ये
#न्यूयॉर्क
जगातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. परदेशात तर हा आकडा सातत्याने वाढतो आहे. एका ताज्या अहवालानुसार, २०२३ मध्ये सर्वाधिक लक्षाधीशांसह न्यूयॉर्कने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत शहराचा बहुमान पटकावला आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरांविषयीचा अहवाल 'ग्लोबल वेल्थ ट्रॅकर हेन्ली अँड पार्टनर्स’ या संस्थेने तयार केला आहे. अहवालानुसार, एकट्या न्यूयॉर्क शहरात ३ लाख ४० हजार करोडपती आहेत.
न्यूयॉर्कनंतर टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को बे शहरात अनुक्रमे दोन लाख ९० हजार तीनशे आणि दोन लाख ८५ हजार रहिवासी लोकसंख्या ही करोडपती आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या २०२३ च्या अहवालात जगभरातील नऊ क्षेत्रांमधील ९७ शहरांचा समावेश आहे. यात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सीआयएस, पूर्व आशिया, युरोप, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि दक्षिणपूर्व आशिया यातील शहरांचा जगातील सर्वाधिक संपत्तीच्या यादीत समावेश आहे.
जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत यंदा अमेरिकेचे वर्चस्व आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, द बे एरिया, लॉस एंजेलिस आणि शिकागो या चार शहरांचा जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. तर चीनमधील दोन शहरे बीजिंग आणि शांघाय हे देखील या यादीत आहेत.
लंडन या वर्षीच्या यादीत २ लाख ५८ हजार करोडपती व्यक्तींसह यादीत चौथ्या स्थानावर घसरले आहे, त्यानंतर सिंगापूरमध्ये २ लाख ४० हजार एकशे करोडपतींसह पाचव्या क्रमांकावर आहे. २००० मध्ये लंडन हे करोडपतींसह जगातील अव्वल शहर होते, परंतु गेल्या २० वर्षांत लंडनचा क्रमांक यादीत खाली घसरत चालला आहे.
करोडपती लोकांचे शहर न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहराला द बिग ऍपल या टोपणनावाने ओखळले जाते. या शहरात ३ लाख ४० हजार करोडपती आहेत. ज्यात ७२४ सेंटी करोडपतींची आणि ५८ अब्जाधीशांची निवासस्थाने आहेत. जगातील दोन सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंजची मुख्य केंद्र याच शहरात आहेत. या शहरामध्ये ब्रॉन्क्स, ब्रुकलिन, मॅनहॅटन, क्वीन्स आणि स्टेटन आयलंड या पाच नगरांचा समावेश आहे, तसेच मॅनहॅटनमधील ५ व्या अव्हेन्यूसह जगातील काही खास सुविधाजनक रस्ते याठिकाणी पाहायला मिळतात. या शहरात प्राइम अपार्टमेंटच्या किमती प्रति चौरस मीटर २७ हजार डॉलरपेक्षा जास्त आहे.
वृत्तसंस्था