अमेरिकेत मध्यरात्री घडला हिंसाचार
#न्यूयॉर्क
न्यूयॉर्कमधील सिरॅक्यूज भागात रविवारी (११ जून) रात्री हिंसाचाराची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण १३ जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री शेकडो तरुण-तरुणी सिरॅक्यूज येथील डेव्हिस रस्त्यावर पार्टीसाठी जमले होते. यावेळी हिंसाचाराची घटना घडली. जखमींपैकी चार जणांवर बंदुकीने गोळ्या झाडल्या आहेत, तर इतर पाच जणांना भोसकले अथवा धावत्या गाडीने धडक दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सिरॅक्यूजचे पोलीस प्रवक्ते लेफ्टनंट मॅथ्यू मालिनोव्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री न्यूयॉर्क शहराच्या पश्चिमेकडील डेव्हिस स्ट्रीटवर शेकडो लोक जमले होते. स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वा बाराच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर ही हिंसाचाराची घटना उघडकीस आली. गोळीबारानंतर आरोपींनी पळून जाताना इतर पीडितांना वाहनाने धडक दिली. मालिनोव्स्की यांनी पुढे सांगितले की, जखमी झालेल्या लोकांमध्ये तीन तरुण आणि दहा तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण १७ ते २५ वयोगटातील आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होतील, अशी अपेक्षा आहे. संबंधित १३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्त्यावरील या पार्टीबाबत सोशल मीडियात जाहिरात करण्यात आली होती. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. शिवाय या पार्टीदरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात केला नव्हता. या पार्टीसाठी शेकडो महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती. रस्त्यावर ही पार्टी सुरू असताना ही हिंसाचाराची घटना घडली. हिंसाचार नेमका का घडला? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.