मेटा, गुगल, स्नॅपचॅट हाजीर हो...
#सॅनफ्रान्सिस्को
अमेरिकेतील मेरीलँड येथील एका शैक्षणिक संस्थेने गुगल, मेटा, स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडिया अॅप्सच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे. हॉवर्ड काऊंटी पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थेने हा खटला दाखल केला आहे. सोशल मीडियामुळे मुलांमध्ये अभूतपूर्व असे मानसिक आरोग्य संकट दिसून येत असल्याचा दावा संस्थेने केला आहे. मुलांना याचे व्यसन लावण्यासाठी कंपन्याच जबाबदार असल्याचेही या शैक्षणिक संस्थेने म्हटले आहे.
गेल्या दशकामध्ये अमेरिकेतील सोशल मीडिया एंगेजमेंट वाढली आहे. हा अपघात किंवा योगायोग नाही. या कंपन्यांनी तरुणांना आपली उत्पादने वापरण्याची सवय लागावी यासाठी अभ्यास करून घेतलेल्या निर्णयांचा हा परिणाम आहे, असे या खटल्यामध्ये म्हटले आहे. या कंपन्यांनी आपल्या वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून, ते अधिकाधिक एंगेज राहतील यासाठी विविध निर्णय घेतले आहेत. जसे मेटाचे इन्स्टाग्राम, फेसबुक; गुगलचे यू-ट्यूब आणि स्नॅपचॅट, टिकटॉक अशी उत्पादने लहान मुलांवर लादली जात आहेत. वापरकर्त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार कंटेंट दाखवणे, त्यांना सातत्याने नवीन कंटेंट दाखवत ठेवणे अशा गोष्टी या कंपन्या करतात. हे टेक्निक तरुण वापरकर्त्यांवर परिणामकारक आणि हानीकारक ठरतात, असे या संस्थेने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.
मुलांना करतायत टार्गेट
अल्पवयीन मुलांनाही सध्या स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अॅक्सेस आहे. या मुलांची सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि ते दिवसातील बराच वेळ यावर व्यतीत करतात. या वापरकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा एंगेज ठेवण्यासाठी या मोठ्या कंपन्या नवनवीन फीचर्स लाँच करतात. यामुळे हे यूजर्स पुन्हा पुन्हा हे अॅप्स वापरतात, असा दावा या खटल्यामध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया,पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, अलाबामा, टेनेसी आणि इतर काही राज्यांमधील शाळा आणि शैक्षणिक संस्थांनीही यापूर्वी अशाच प्रकारचे खटले दाखल केले आहेत.