माध्यमसम्राट मर्डोक यांचे लग्न मोडले
#न्यूयॉर्क
माध्यमसम्राट रुपर्ड मर्डोक यांचे लग्न आणि घरसंसार जगाच्या आवडीचा विषय आहे. ९२ वर्षीय मर्डोक एका धर्मोपदेशक लेस्ली स्मिथशी विवाह करणार ही बातमी आता शिळी झाली आहे. कारण मर्डोक यांचे स्मिथसोबत होणारे नियोजित लग्न मोडले आहे.
माध्यमसम्राट मर्डोक आणि पोलीस विभागात धर्मोपदेशकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या लेस्ली स्मिथ यांनी साखरपुडा केला होता. ते दोघे विवाहबद्धही होणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. लेस्लीसोबतचे लग्न हा माझ्या आयुष्यातील शेवटचा टप्पा आहे. शेवटपर्यंत आम्ही एकत्र राहणार असल्याचे मर्डोक म्हणाले होते. ९२ वर्षांचे मर्डोक ६६ वर्षीय लेस्लीसोबत विवाह करण्याच्या विचाराने आनंदी होते. तशी घोषणाही त्यांनी केली होती. कारण लेस्लीसोबत लग्न करण्यात मर्डोक यांना कायदेशीर अडचण येणार नव्हती. मर्डोक यांची चौथी पत्नी जेरी हॉल हिच्यासोबत काडीमोड कायदेशीररीत्या पार पडलेला आहे. त्यामुळेच मर्डोक यांनी पाचव्यांदा बोहल्यावर बसण्याची जोरदार तयारी केली होती.
लेस्लीसोबत लग्न करण्याच्या कल्पनेमुळे मी घाबरलो होतो. मात्र अखेर ते घडलेच. आता मी शेवटच्या टप्प्यात आहे, उर्वरित आयुष्य लेस्लीसोबत व्यतीत करणार आहे. कदाचित हेच माझे शेवटचे प्रेम आणि शेवटचा विवाह असेल, असेही मर्डोक यांनी साखरपुड्याच्या कार्यक्रमात बोलून दाखवले होते. जेरी हॉलशी लग्न करण्यापूर्वी झालेल्या तीन लग्नामुळे मर्डोक यांना सहा मुले झाली आहेत. द वाॅल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार मर्डोक हे १ लाख ४० हजार ६८७ कोटी रुपयांचे धनी आहेत.