संग्रहित छायाचित्र
माले: भारत (India) आणि मालदीव (Maldives) यांच्यातील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू (Mohamed Muizzu) हे आतापर्यंत भारताला कडाडून विरोध करत होते, मात्र आता त्यांची हुकूमशाही वृत्ती देशातही समोर येत आहे. त्यांनी विरोधी पक्षांना संसदेत येण्यापासून रोखले. त्याचवेळी, चार मंत्रिमंडळ सदस्यांबाबत विरोधकांची मान्यता न मिळाल्याने मालदीवच्या संसदेत प्रचंड गदारोळ झाला आणि खासदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान मुइज्जू यांच्या खासदारांनाही मारहाण झाली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संतापाची भावना वाढीस लागली असून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरु केली आहे.
मोइज्जू यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. विशेष म्हणजे, लवकरच त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली जाऊ शकते. मालदीवच्या संसदेत दुसऱ्या क्रमांकाचे सदस्य हे मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) आहेत. पक्षाचे म्हणणे आहे की, 'मोइज्जू यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी पुरेशा खासदारांची सहमती आहे. एका एमडीपी खासदाराने सांगितले की, 'इतर सहकाऱ्यांसह मोइज्जू यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांनी अद्याप तसा प्रस्ताव दिलेला नाही.
दुसरीकडे, एक दिवस आधी मालदीवच्या संसदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा हाणामारीचा व्हीडीओ समोर आला होता. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. वास्तविक, मंत्रिमंडळ सदस्यांच्या मंजुरीबाबत चीन समर्थक मुइज्जू आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. एमडीपीने चार सदस्यांना मान्यता दिली नाही. यानंतर मुइज्जू यांच्या पक्षाच्या खासदारांनी संसदेत विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर खासदार अब्दुल्ला शाहीम, अब्दुल हकीम शाहीम आणि अहमद इसा एकमेकांना भिडले. यामध्ये शाहीम यांना दुखापत झाली. विशेष म्हणजे, हाणामारीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदार सभापतींच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. एमडीपी आणि डेमोक्रॅट्सने आधीच ठरवले होते की, ते मुइज्जू मंत्रिमंडळासाठी चार सदस्यांच्या नावांना मान्यता देणार नाहीत. मालदीवमध्ये सध्या मुइज्जू यांचे आघाडी सरकार आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुरेशा खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षाने सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला. एका विशिष्ट पक्षाला पाठिंबा देऊन आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचा आरोप सभापतींवर करण्यात आला.
मालदीवचे विरोधक चिंतेत
भारताच्या विरोधामुळे मालदीवचे विरोधक चिंतेत आहेत. मुइज्जू यांच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीलाही माजी राष्ट्राध्यक्षांनी विरोध केला होता. मुइज्जू आणि भारत आमने-सामने आल्यापासून मालदीवमधील विरोधक सत्तेसाठी अधिक आक्रमक दिसत आहेत. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष बनताच चीन समर्थक मुइज्जू यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यामुळेच मालदीवच्या जनतेने त्यांना जनादेश दिला असल्याचे ते म्हणाले.