माहेरघर मधुचंद्राचे आणि घटस्फोटांचेही
#माले
निर्सगसौंदर्याने नटलेल्या मालदिवला मधुचंद्रासाठी जगभरातील नवविवाहित जोडप्याची पहिली पसंती असते. सुंदर समुद्र किनारा, अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी मालदिव प्रसिद्ध आहे. नवविवाहितांचा तर हा स्वर्ग समजला जातो. मात्र मधुचंद्रासाठी विख्यात मालदिवमध्येच सर्वाधिक घटस्फोट होतात.
मालदिव जगातला असा देश आहे जिथे सर्वाधिक घटस्फोट होतात. घटस्फोटांचे प्रमाण अलीकडील काळात वाढलेले नसून अनेक दशकांपासून इथे मोठ्या प्रमाणात घटस्फोट होतात. वर्ष २००० मध्ये इथे साधारण ४ हजार विवाह झाले होते, तर त्यातील २ हजार जोडप्यांचे घटस्फोट झाले होते. मालदिवसारख्या द्वीपावर लग्न करणे सोपे असते. द्वीप लहान असल्याने भेटीगाठीही होत असतात. इथल्या स्त्रिया आकर्षक असतात, पण विचित्र बाब म्हणजे इथले मच्छीमार पुरुष अनेक महिन्यांसाठी समुद्र यात्रेवर निघून जातात आणि दुसऱ्या बेटावर वास्तव्य करू लागतात. या काळात त्यांच्या जोडीदारालाही सोबत हवी असते या कारणाने ते जाताना बायकोला घटस्फोट देऊन जातात, जेणे करून ती तिचे आयुष्य जगू शकेल. ही तात्पुरती सोय असते. लग्न करतात आणि समुद्र प्रवासाला जाताना घटस्फोट घेतात.
घटस्फोटांची जागतिक नोंद
सर्वाधिक घटस्फोटांच्या प्रमाणासाठी मालदिवची नोंद जागतिक विक्रमांची नोंद घेणाऱ्या 'गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे. इस्लामिक नियम आणि शरियानुसार घटस्फोट देणे सोपे आहे, पण मागील काही वर्षात सरकारने घटस्फोटाचा दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत जे पती कोर्टाशिवाय घटस्फोट देतात, त्यांना मोठा दंड भरावा लागतो. भारत किंवा अन्य देशांप्रमाणे इथले लोक लग्नासाठी भरमसाठ खर्च करत नाहीत. वर वधूला एक लहानशी रक्कम देण्याचे वचन देतो. यानंतर जवळच्या नातेवाईकांसोबत एक चहा पार्टी होते आणि विवाह झाल्याची घोषणा केली जाते.
अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा
ही परंपरा अनेक दशकांपासून चालत आलेली आहे. हिंद महासागरातल्या या लहानशा देशात घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक विवाह विच्छेदनाच्या आकडेवारीनुसार मालदिवमध्ये प्रत्येक हजार लग्नांमागे ५.५२ टक्के घटस्फोटाचे प्रमाण आहे. हा आकडा अमेरिका, कॅनडा अशा कोणत्याही आधुनिक देशांपेक्षा बराच मोठा आहे. ९० च्या दशकात इथे लग्न आणि घटस्फोट दोन्हीचे प्रमाण जास्त होते. तेव्हा हजार प्रौढांमागे ३४.४ टक्के प्रौढ लग्न करत असे. उपलब्ध माहितीनुसार १९७७ मध्ये ३० वर्ष वय असणाऱ्या महिलांचा तीन वेळा घटस्फोट झालेला असे. याच्या कारणांचा शोध घेतल्यावर सामाजिक शास्त्रज्ञांना यामागे अनेक कारणे आढळली. बहुतांश इस्लामिक देशांच्या तुलनेत मालदिवमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे, याचे कारण म्हणजे हे लोक समुद्र प्रवास जास्त करतात. ते कधी परतणार माहीत नसते, शिवाय परत आल्यावर त्याच जोडीदारासोबत राहतील याची शाश्वती नसते, त्यामुळे घटस्फोट दिले जातात.