फ्रान्सच्या संसद निवडणुकीत मॅक्रॉन यांचा पक्ष पिछाडीवर

फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेच्या निवडणुकीत अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पक्ष पिछाडीवर पडला आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी मतदानाचा निकाल जाहीर केला. त्यानुसार, उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय रॅलीला सर्वाधिक ३५.१५ टक्के मते मिळाली असून डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंटला २७.९९ टक्के मते मिळाली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 2 Jul 2024
  • 01:16 pm
world news, France elections, Emmanuel Macron,

संग्रहित छायाचित्र

पराभव झाला तरी मॅक्रॉन अध्यक्षपदावर कायम राहणार, सरकार चालविण्यात येणार अडचणी

पॅरिस: फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेच्या निवडणुकीत अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पक्ष पिछाडीवर पडला आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी मतदानाचा निकाल जाहीर केला. त्यानुसार, उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय रॅलीला सर्वाधिक ३५.१५ टक्के मते मिळाली असून डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंटला २७.९९ टक्के मते मिळाली आहेत. त्याचवेळी, मॅक्रॉन यांची रेनेसान्स पार्टी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना २० टक्के ७६ मते मिळाली आहेत. निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स पार्टीचा पराभव झाला तरी मॅक्रॉन पदावर कायम राहतील. येथे संसद आणि अध्यक्षीय निवडणुका वेगवेगळ्या आहेत.    

राष्ट्रीय संसदेच्या ५७७ जागांसाठी रविवारी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ७ जुलै रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फक्त तेच उमेदवार उभे राहू शकतात, ज्यांना पहिल्या टप्प्यात १२.५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. राष्ट्रीय संसदेमध्ये बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला २८९ जागा जिंकणे आवश्यक आहे. संसदेचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपणार होता. युरोपियन युनियनमधील मोठ्या पराभवामुळे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या महिन्यात संसद मुदतपूर्व विसर्जित केली होती.

वास्तविक मॅक्रॉन युतीच्या मदतीने सरकार चालवत होते. त्यांच्या आघाडीला केवळ २५० जागा मिळाल्या. प्रत्येक वेळी कायदा करण्यासाठी त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागत होता. सध्या, उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय रॅलीला  संसदेत ८८ जागा आहेत. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर उजव्या विचारसरणीची राष्ट्रीय रॅली ५७७ पैकी २३०-२८० जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंटला १२५- १६५ जागा मिळू शकतात.

मॅक्रॉनच्या रेनेसान्स पार्टी आणि त्यांच्या युतीला केवळ ७० ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. संसद निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स पार्टीचा पराभव झाला तरी मॅक्रॉन पदावर कायम राहतील. मॅक्रॉन यांनी आधीच सांगितले आहे की, कोणीही जिंकले तरी ते अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाहीत. युरोपियन युनियनच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जर मॅक्रॉन यांच्या पक्षाचा संसदेत पराभव झाला, तर त्यांच्यावर अध्यक्षपद सोडण्यासाठी दबाव येऊ शकतो. त्यामुळे आपण आपले पद सोडणार नसल्याचे मॅक्रॉन यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

संसदीय निवडणुकीत मरीन ले पेन यांच्या राष्ट्रीय रॅली पक्षाने बहुमत मिळविल्यास मॅक्रॉन यांची बाजू संसदेत मोठ्या प्रमाणात कमकुवत होईल आणि कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी, नवीन सरकारी योजना सादर करण्यासाठी त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासेल.

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष आणि संसद निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात. अशा स्थितीत संसदेत एखाद्या पक्षाचे बहुमत नसले तरी त्या पक्षाचा नेता राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकू शकतो.  २०२२ च्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉनच्या बाबतीतही असेच घडले. त्यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकली, पण त्यांच्या युतीला संसदेत बहुमत मिळाले नाही.

विरोधी पक्ष राष्ट्रीय रॅलीला संसदेत बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. बहुमत मिळाले तर घटनेनुसार मॅक्रॉन त्या पक्षाचे सिनेट खासदार निवडतील. राष्ट्रीय रॅलीचे नेते जॉर्डन बार्डेला यांनी म्हटले आहे की, जर त्यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर ते कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होणार नाहीत. त्यांना अध्यक्ष मॅक्रॉनचे साहाय्यक बनायचे नाही. राष्ट्रीय रॅलीला बहुमत मिळाल्यास फ्रान्समध्ये पुन्हा सहअस्तित्वाचे राष्ट्रीय सरकार स्थापन होऊ शकते. सहअस्तित्व सरकार म्हणजे ज्या सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या सहकार्याने सरकार चालवले जाते.

देशांतर्गत धोरण पंतप्रधानांच्या हातात असताना आणि परराष्ट्र, संरक्षण धोरणाचे निर्णय राष्ट्रपती घेतात.  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी असा इशारा दिला आहे की, उजव्या विचारसरणीचे पक्ष देशाला गृहयुद्धाच्या स्थितीकडे ढकलू शकतात. 

भारताप्रमाणेच फ्रान्समध्येही संसदेची दोन सभागृहे आहेत. संसदेच्या वरच्या सभागृहाला सिनेट आणि खालच्या सभागृहाला राष्ट्रीय संसद म्हणतात. संसद सदस्य सामान्य जनतेद्वारे निवडले जातात. सिनेट सदस्य संसद सदस्य आणि अधिकारी निवडतात. या महिन्यात युरोपियन संसदेच्या निवडणुका झाल्या ज्यात मॅक्रॉनच्या पक्षाला १५ टक्के पेक्षा कमी मते मिळाली. राष्ट्रीय रॅलीला ३१.४ टक्के मते मिळाली. निवडणूक निकाल येण्यापूर्वीच मॅक्रॉन यांनी अचानक संसद विसर्जित केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest