कराची-दुबई-काठमांडूमार्गे प्रेमासाठी प्रेिमका भारतात
#इस्लामाबाद
प्रेम साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची किंवा कोणत्याही स्थितीला तोंड देण्याची प्रेमीजनांची तयारी असते. असेच एक प्रेम दोन देशांत फुलले आणि ते सफल करण्यासाठी ही तरुणी दोन देशांच्या सीमा ओलांडून भारतातील बंगळुरूमध्ये दाखल झाली. या प्रेमिकेचा हा खडतर प्रवास कसा झाला याचा उलगडा तिच्या काकांनी केला आहे.
पाकिस्तानमधील एका कट्टर धार्मिक घरातील तरुणीने आपले दागिने विकले, मित्रांकडून उधार उसनवारी केली. मिळालेल्या पैशांतून दुबई, तेथून काठमांडूचे विमान तिकीट खरेदी केले. बाकीच्या पैशांतून काठमांडूहून तिने बंगळुरू गाठले. या प्रेमकथेतील तरुणीचे नाव इक्रा जीवानी असे असून तिच्या प्रियकराचे नाव मुलायमसिंह यादव असे आहे. मुलायम सध्या तुरुंगात असून इक्राला ताब्यात घेऊन वाघा सीमेवर तिला पाकिस्तानच्या ताब्यात सोपवले आहे.
ऑनलाईनवर त्यांची भेट झाली आणि लवकरच या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. लग्न करण्याचे या जोडप्याने ठरवल्यावर काही महिन्यांपूर्वी तिने नेपाळ गाठले आणि त्यांनी विवाह केला. ही तरुणी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते. या प्रकरणात आपल्या घराण्याचे नाव येऊ नये असे तिच्या माता-पित्यांना वाटते. तिला वाघा सीमेवर पाकिस्तानच्या ताब्यात दिल्यानंतर लाहोर येथे जाऊन तिच्या आई-वडिलांनी तिला ताब्यात घेतले. गेल्या सप्टेंबरमध्ये कॉलेजला जाते असे सांगून बाहेर पडलेली इक्रा घरी परतली नाही. इक्राशी बोलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, तिच्या वडिलांनी म्हणजे सोहेल जीवानी यांनी हे प्रकरण आमच्यासाठी संपल्याचे सांगून विषय मिटवला. ते म्हणाले की, इक्रा तशी खूपच लाजाळू आहे. प्रेमासाठी दोन देशांच्या सीमा ओलांडून भारत गाठण्याचे धैर्य तिने कसे जमवले याचे आम्हाला आश्चर्य वाटते. गेल्या चार महिन्यांत घडलेल्या घटनांचा आम्हाला जबर धक्का बसला असून त्यातून आम्ही सावरलेलो नाही. मुलायमने आपली ओळख मुस्लीम सॉफ्टवेअर इंजिनिअर अशी करून दिली होती. १६ वर्षांची इक्रा प्रेमासाठी कराचीहून दुबईला, तेथून काठमांडू आणि त्यानंतर भारतात कशी गेली हे अजूनही गूढच आहे. २६ वर्षीय मुलायसिंह यादव बंगळुरूमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. ऑनलाईन लुडो गेम खेळताना इक्रा आणि मुलायमची ओळख झाली. लग्नानंतर बंगळुरूमध्ये राहताना इक्राने रावा नाव घेतले होते. मुलायमने रावा नावाने आधार कार्ड काढले होते. तसेच पासपोर्टसाठी अर्ज केला होता. हिंदू असूनही ती नमाज पडत असल्याचे पाहून शेजाऱ्यांना शंका आली. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर या सीमापार प्रेमाचे भांडे फुटले. पोलिसांनी इक्राला ताब्यात घेऊन ती भारतात कशी पोहोचली याची चौकशी केली. इक्राला बंगळुरूमध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने व्हॉट्सॲपवर घरच्यांशी संपर्क केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताशी संपर्क साधून या प्रकरणाची सोडवणूक केली.
वृत्तसंंस्था