'लिंक्डइन' करणार कर्मचारीकपात
#कॅलिफोर्निया
जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देऊन अनेक दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये अॅमेझॉन, गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे. आता या कंपन्यांमध्ये 'लिंक्डइन'चाही समावेश झाला आहे. 'लिंक्डइन' कंपनीनेदेखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
'लिंक्डइन' कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३.५ टक्के म्हणजेच ७१६ कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. तसेच, कंपनी चीनकेंद्रित जॉब अॅप्लिकेशन देखील बंद करणार आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन आणि मागणीत झालेली घट यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मालकीची कंपनी आहे. 'लिंक्डइन' मध्ये सुमारे २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कंपनीचा महसूल वाढला असला, तरी कंपनी कर्मचारी कपात केलेल्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.
'लिंक्डइन'चे सीईओ रायन रोस्लान्स्की यांनी याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणाले, ”कंपनीचे कामकाज अधिक चांगले करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपनीला लवकर निर्णय घेण्यास मदत होईल.” कंपनीच्या सेल्स, ऑपरेशन अणि सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या मेटाने २१ हजार, तर गूगलने १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.