जेफ्री हिंटन यांचा गुगलला रामराम
#वॉशिंग्टन
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाणाऱ्या जेफ्री हिंटन यांनी गुगलचा राजीनामा दिला आहे. गुगल सोडणार असल्याचे त्यांनी मागच्या आठवड्यातच स्पष्ट केले होते. मी जे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम केले, त्याच्या धोक्यांबद्दल, दुष्परिणामाबद्दल जनजागृती करण्यासाठीच मी गुगलमधून पायउतार होत असल्याचेही हिंटन म्हणाले आहेत.
‘एआय’ प्रणालीसाठी मूलभूत तंत्रज्ञानाची निर्मिती हिंटन यांनी केली आहे. ‘एआय’आधारित अनेक उत्पादने विकसित करण्यात हिंटन यांची महत्त्वाची भूमिका आहे. गुगलचे ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी त्यांनी मागच्या अकरा वर्षांपासून संशोधन केले आहे. गुगल आणि ओपन एआयने (लोकप्रिय एआयचा चॅटबोट चॅटजीपीटीचा स्टार्टअप) २०२२ मध्ये पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात डेटा वापरून प्रणाली तयार करण्यास सुरुवात केली होता. हिंटन यांनी त्यांच्या दोन विद्यार्थ्यांसोबत मिळून एक अल्गोरिदम तयार केला होता, जो फोटोंचे विश्लेषण करण्यास सक्षम होता. त्यांच्यासोबत या प्रकल्पावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक आता 'ओपन एआय' चा मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. चॅटजीपीटीसारखे चॅटबॉट्स लवकरच मानवी मेंदूकडे असलेल्या माहितीची पातळी ओलांडू शकतात. एआयने मनुष्यबळ कपात का केली आहे, यामागील खरे कारण सर्वसामान्य लोकांना माहिती नाही.मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे तंत्रज्ञान मानवी विचारशक्तीला मार्क ठरू शकते, हे आता मी उभ्या जगाला सांगणार आहे, असे हिंटन म्हणाले आहेत.
वृत्तसंस्था