उपग्रह प्रक्षेपणात कोरिया अपयशी
#पेंग्वाँग
उत्तर कोरियाचा 'मलिग्याँग-१' हा गुप्तहेर उपग्रह वाहून नेणारा 'चोलिमा-१' अग्निबाण समुद्रात कोसळल्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण अयशस्वी झाले. उत्तर कोरियाने या मोहिमेची कल्पना जपानला दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये ही मोहीम फसल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले. त्याच वेळी उपग्रह प्रक्षेपणाचा दुसरा प्रयत्न लवकरच केला जाईल असेही सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध ताणलेले असतानाच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी महत्त्वाकांक्षी संरक्षण उपग्रहाच्या प्रक्षेपणाची मोहीम जाहीर केली होती. त्याला आता धक्का बसल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाने केलेले उपग्रह प्रक्षेपण हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाविरोधात होते. या देशाने यापूर्वी केलेल्या उपग्रह प्रक्षेपणांमधून क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सुधारले असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यांनी अलीकडील काही वर्षांमध्ये संपूर्ण अमेरिका खंडापर्यंत पोहोचू शकेल असे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. मात्र, अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी उत्तर कोरियाला अजून प्रयत्न करावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे.