किम जोंग उनचे अभिनंदन ट्रम्प यांना महागात?
#वॉशिंग्टन
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कुठल्या तरी कारणामुळे प्रकाशझोतात असतात. यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेचा हितशत्रू असलेल्या उत्तर कोरियाला नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, पण हे अभिनंदन करतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोटाळा करून ठेवला आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कृतीमुळे त्यांच्या पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना टीकेसाठी आयताच मुद्दा मिळाला आहे. २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील ट्रम्प यांची प्रतिस्पर्धी असलेल्या निक्की हेली यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. जे अमेरिकेचे शत्रू आहेत, जे स्वतःच्या नागरिकांना उपाशी ठेवतात, त्या किम जोंग ऊन यांचे अभिनंदन करून ट्रम्प यांनी काय साध्य केले आहे? यासाठीच पुन्हा अमेरिकेचे नेतृत्व त्यांना द्यायचे आहे का? अशा शब्दांत हेली यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ज्यो बायडेन यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या जागी चांगला सक्षम राष्ट्राध्यक्ष निवडून देण्याची गरज आहे, मात्र त्यासाठी ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याची गरज नसल्याचा निशाणा जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन कॅम्प यांनी साधला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा कसा आहे हे ठाऊक असताना ट्रम्प त्याचे अभिनंदन का करत आहेत, असा सवाल फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसांटिस यांनी उपस्थित केला आहे.