खाप पंचायतीचे आंदोलन मागे
#नवी दिल्ली
भारतीय महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ भारतीय किसान युनियन आणि खाप पंचायत येत्या शुक्रवारी, ९ जूनला जंतर-मंतरवर आंदोलन करणार होते. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी हे आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगितले. राकेश टिकैत यांनी जर ९ जूनपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक झाली नाही तर खाप पंचायत आंदोलन करणार असा इशारा दिला होता. मात्र आता हे आंदोलन होणार नाही.
आंदोलनात अग्रभागी असलेल्या बजरंग पूनियाने रविवारी महापंचायतीमध्ये शेतकरी आणि खाप पंचायतींना याबाबत निर्णय घेऊ नका अशी विनंती केली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, 'आता कुस्तीपटूंची सरकार आणि गृहमंत्री यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे ९ जून रोजी जंतर-मंतरवर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. कुस्तीपटू जेव्हा समर्थनासाठी आम्हाला सांगतील तेव्हा नक्कीच त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरू.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून महिनाभर आंदोलन करणारे बजरंग पूनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट दोन तास चालली होती. वृत्तसंस्था
ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पूनिया अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पुढच्या दिवशी सोनीपथ येथील मुंडलाना पंचायतीमध्ये पोहचला होता. त्यावेळी त्याने शेतकरी आणि खाप पंचायतींना संबोधित करताना सांगितले की, 'मी तुम्हाला विनंती करतो की आता कोणताही निर्णय घेऊ नका. लवकरच आम्ही सर्व क्रीडा संघटनांना एका मंचावर बोलवून एक मोठी पंचायत आयोजित करणार आहोत. महापंचायतीबाबत तीन ते चार दिवसात निर्णय घेतला जाईल. याबरोबरच सर्व पंचायतींना स्थान आणि वेळेबाबत देखील माहिती दिली जाईल.'