खलिस्तान समर्थकांचा हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला
#कॅनबेरा
ऑस्ट्रेलियात खलिस्तानी गटाकडून सातत्याने हिंदू मंदिरावर हल्ले करण्यात येत आहेत. शनिवारी ब्रिस्बेन शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला असून मंदिरातील देवतांच्या प्रतिमांची तोडफोड करण्यात आली आणि भिंतीवरही आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
खलिस्तानी गटाकडून हिंदू मंदिरावर हल्ला करण्याची ही ऑस्ट्रेलियातील दोन महिन्यांतली चौथी घटना आहे. पूजेसाठी मंदिरात आलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही घटना आली आणि त्यांनी तत्काळ मंदिर समितीला याची माहिती दिली. ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील बरबँक उपनगरातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली आहे.
मेलबर्नच्या हिंदू मंदिरांमध्ये काय घडले हे मला माहीत आहे, परंतु या द्वेषाला सामोरे जाण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे. हा एक अतिशय दुःखद अनुभव असल्याची व्यथा मंदिराजवळ राहणारे रमेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. मंदिर समितीचे प्रमुख सतींदर शुक्ला यांनी सांगितले की, मंदिराचे पुजारी आणि भाविकांनी सकाळी फोन करून मला तोडफोडीची माहिती दिली. व्यवस्थापन समिती पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर सविस्तर निवेदन देणार असल्याचे शुक्ला म्हणाले आहेत. याआधी ब्रिस्बेनमधील गायत्री मंदिरात खलिस्तानी अतिरेक्यांकडून धमकीचा फोन आला होता. ऑस्ट्रेलियन हिंदूंना घाबरवण्यासाठी 'शिख्स फॉर जस्टिस'कडून ही कृत्ये केली जात आहेत, असा आरोप 'हिंदू मानवाधिकार' संस्थेच्या संचालक सारा एल गेट्स यांनी केला आहे.
दरम्यान यापूर्वी जानेवारी महिन्यात शिव विष्णू मंदिरात हिंदूंच्या भावना दुखावणारी छायाचित्रे भिंतींवर रेखाटण्यात आली होती. शीख फॉर जस्टीस संघटना ऑस्ट्रेलियातील हिंदूंच्या विरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहे. १५ जानेवारी २०२३ रोजी याच संघटनेने मेलबर्नला एक कार रॅली काढण्याचा प्रयत्न केला होता. मेलबर्नमध्ये भारतीय वंशाचे ६० हजार लोक वास्तव्यास आहेत, मात्र यांच्या रॅलीत २०० लोकही सहभागी झाले नव्हते. यापूर्वी १२ जानेवारीलाही एका मंदिरात हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वृत्तसंंस्था