जरा तुमच्या नियमावलीचा अभ्यास करा
#ब्रुसेल्स
जे कच्चे तेल भारत रशियाकडून खरेदी करतो त्यावर भारतीय रिफायनरी प्रक्रिया करतात त्यामुळे त्यानंतर हे तेल रशियाचे नसते तर भारताचे असते, युरोपियन युनियनच्या नियमांनुसारच भारत हे तेल युरोपला विकत आहे, त्यामुळे या व्यवहाराबाबत भारतावर आगपाखड करण्यापेक्षा आपल्या नियमांचा अभ्यास करावा, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपियन देशांना खडे बोल सुनावले आहेत.
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि त्यावर प्रक्रिया करून ते युरोपियन देशांना विकतो आहे. भारत आणि रशियातील कच्च्या तेलाच्या या व्यापाराबाबत युरोपियन युनियनच्या सदस्य देशांचा विशेष राग आहे. युरोपियन युनियनने अनेक वेळा या व्यापाराबाबत भारतावर आर्थिक निर्बंध लादण्याची भाषा केलेली आहे. मात्र आता भारताची नाराजी नको असलेल्या अमेरिकेने त्याबाबत नेहमीच पाठराखण केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सध्या युरोप दौऱ्यावर गेले असून तिथे पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यावर जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या व्यापारविषयक नियमांचा दाखला देत खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित होते.
नेमके घडले तरी काय?
युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरणाचे सर्वेसर्वा जोसेफ बोरेल यांनी काही दिवसांपूर्वी भारताबाबत एक विधान केले. त्याला प्रतिक्रिया म्हणून जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या परिस्थितीचा लाभ उचलत भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. भारतीय रिफायनरी या तेलावर प्रक्रिया करून तेच तेल युरोपियन देशांना विकत आहे. या व्यवहारात भारताला फायदा होत आहे. जोसेफ बोरेल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत भारताच्या या व्यवहारावर आक्षेप घेतला आहे. या लबाडीबद्दल भारतावर आर्थिक निर्बंध लादायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भेटीपूर्वीच बोरेल यांच्या टीकेचा समाचार
युरोप दौऱ्यावर गेलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरणाचे सर्वेसर्वा जोसेफ बोरेल यांचीही भेट घेणार आहेत. मात्र तत्पूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जोसेफ बोरेल यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. या पत्रकार परिषदेस बोरेल यांच्याऐवजी युरोपियन युनियनच्या व्यापारी मंडळाचे कार्यकारी उपाध्यक्ष मार्गरेथ वेस्टेगर यांनी हजेरी लावली. जयशंकर म्हणाले की, बोरेल यांच्या बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. युरोपियन युनियनच्या व्यापारविषयक नियमावलीतील २०१४ च्या ८३३ व्या तरतुदीचा त्यांना विसर पडला असावा. याच तरतुदीनुसार भारत हा व्यवहार करत आहे. रशियाचे तेल भारतात जात असेल आणि त्यावर भारत प्रक्रिया करून ते तिसऱ्या देशांना विकत असेल तर त्या तेलाला रशियन मानले जाणार नाही. दरम्यान जयशंकर यांच्या प्रत्युत्तरानंतर मार्गरेथ वेस्टेगर यांनी सारवासारव करत या विषयाला कलाटणी दिली आणि युरोपियन युनियन नेहमीच भारतासोबतचे मैत्रीपूर्वक संबंध वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.