यंदाचा जून महिना सर्वाधिक उष्ण
#वॉशिंग्टन
जून महिना आला म्हणजे पावसाळा सुरु होणार, असा वर्षानुवर्षे चालत आलेला समज आता मोडीत निघाला आहे. जून आला म्हणजे उन्हाळा संपला, आता पाववसाचा धारा बरसतील आणि सर्वत्र आल्हाददायक वातावरण असेल, असा समजही गैर ठरला आहे. कारण यंदाच्या जून महिन्यात हे समज चुकीचे ठरले आहेत. हवामानशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, यंदाचा जून जगभरात आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण जून महिना ठरला आहे.
पृथ्वीचे तापमान वाढतच असून जून महिन्याच्या जुन्या विक्रमापेक्षा यंदाच्या जूनमध्ये ०.१३ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली. जागतिक महासागरांमध्ये सलग तिसऱ्या महिन्यांत विक्रमी तापमानाची नोंद झाल्यामुळेही जूनने यापूर्वीचा तापमानाचा विक्रम मोडल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरी व वातावरणीय प्रशासनाने (नोआ) दिली आहे. त्याचप्रमाणे, २०२३ या वर्षाची सर्वाधिक उष्ण १० वर्षांत नोंद होण्याची शक्यता ९९ टक्के तसेच सर्वाधिक उष्ण अशा पहिल्या पाच वर्षांत नोंद होण्याची शक्यता ९७ टक्के असल्याचा नोआचा दावा आहे.
१७४ वर्षांतील सर्वाधिक उष्ण जून
‘नासा’ आणि ‘नोआ’ या संस्थेतील वैज्ञानिकांच्या मते यंदाचा जून गेल्या १७४ वर्षांतील सर्वाधिक उष्ण जून ठरला. यंदाच्या जूनमध्ये जागतिक कमाल सरासरी तापमान १६.५५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते २० व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा १.०५ अंश सेल्सिअसने अधिक होते तसेच यंदा प्रथमच उन्हाळ्याच्या महिन्यात सामान्यापेक्षा एक अंश सेल्सिअस अधिक तापमान होते, असेही नोआतील संशोधकांनी सांगितले. यापूर्वी नासा, बर्कले अर्थ आणि युरोपच्या कोपर्निकस या हवामान संस्थांनीही यंदा सर्वाधिक उष्ण जून महिन्याची नोंद झाल्याची माहिती दिली होती. मात्र, १८५० पासून हवामानाचा डेटा ठेवल्यामुळे नोआला वेगळा दर्जा आहे. यंदाचा जून महासागरांसाठीही सर्वाधिक उष्ण ठरला. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७० टक्के क्षेत्रफळ असलेल्या समुद्रांच्या पृष्ठभागांमध्ये यंदा एप्रिल, मे आणि जून अशा सलग तीन महिन्यांत मासिक उच्च तापमानाची नोंद होण्याची ‘हॅटट्रिक’ झाली. तर उत्तर अटलांटिक मार्चच्या मध्यापासून ऊबदार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. कॅरिबियन प्रदेशाने ब्रिटनप्रमाणेच तापमानाचे यापूर्वीचे विक्रम मोडले.
‘नोआ’च्या हवामान शास्त्रज्ञ अहिरा सांचेझ-लुगो यांनी सांगितले, की जागतिक तापमानाच्या मासिक नोंदी इतक्या विस्तृत असतात की त्या नेहमी अंशाच्या शेकडो नव्हे तर चतुर्थांश भागाने अधिक नोंदवल्या जातात. त्यामुळे, गेल्या जूनच्या तापमानाच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये तापमानाने मोठी उडी घेतल्याचे दिसले, असेही ते म्हणाले.
चक्रीय पद्धतीमुळे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आणि अतिरिक्त उष्णतेमुळे जगभरातील हवामान बदलून जागतिक तापमानात वाढ झाली. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या युरोपिय युनियनच्या कोपर्निकस संस्थेच्या म्हणण्यानुसार, या वर्षीचा जून हा जगभरात सर्वाधिक उष्ण होता. १९९१ ते २०२० मधील जून महिन्यांतील सरासरी तापमानापेक्षा यंदाच्या जूनमध्ये ०.५ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे.