जनता उपाशी व्हीआयपी तुपाशी
#इस्लामाबाद
सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाहीत, मित्र देश वाढीव व्याज दराने कर्ज देण्यासाठी उत्सुक आहेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकापेक्षा एक कठीण अटी लादत आहे. तर सर्वसामान्य जनता दूध, गव्हाच्या पिठाला महाग झाली असताना एका विवाह सोहळ्यात केवळ नवरा-नवरीवर ७२ कोटींची उधळण करण्यात आली तर आपण काय समजायचे? हे अगदी खरे असून पाकिस्तानमधील इला शाही विवाह सोहळ्यात घडले आहे.
आर्थिक संकटाला सामोरे जाताना पाकिस्तान सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता दयनीय अवस्थेत दिवस काढत आहे, अशावेळी पाकिस्तानच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात पै-पाहुण्यांकडून नवरा-नवरी आणि सासरवाडीच्या लोकांवर ‘सलामी’ म्हणून ७२ कोटी रुपयांची रक्कम उधळली गेली आहे. सलामी म्हणजे विवाह सोहळ्यात नवरा-नवरीला दिली जाणारी भेट अथवा आहेर. पाकिस्तानमध्ये तशी प्रथा प्रचलित आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद आसिफ यांनीच या लज्जास्पद प्रकाराची माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याच्या पहिल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात याहून अधिक रक्कम सलामी म्हणून देण्यात आली असल्याचेही आसिफ म्हणाले आहेत.
चौधरी परवेज इलाही हे आसिफ यांचे मित्र त्या विवाह सोहळ्याला हजर होते. तिथे सलामी गोळा करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितले की, आतापर्यंत ७२ कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही सलामी उधळणे सुरू आहे. विशेष म्हणजे या आहेरात दागदागिने आणि महागड्या गाड्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. म्हणजे झालेली उधळपट्टी त्या व्यतिरिक्त होती. देशातील जनता भिकेला लागलेली असताना प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नातेवाईकांकडे हा पैसा कुठून आला? एवढी उधळपट्टी का करण्यात आली ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद आसिफ यांनी हा प्रसंग संसदेतही उपस्थित केला आहे. वृत्तसंंस्था