'इसिस'च्या बंडखोरांचा युगांडातील शाळेवर हल्ला
#कंपाला
युगांडामधील ‘अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’ (एडीएफ) या इसिसशी संबंधित संघटनेच्या बंडखोरांनी एका शाळेवर सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात किमान ४१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर १० विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. 'अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’ ही 'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंधित संघटना आहे.
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस आणि युगांडा सैन्यांनी दिली आहे. पुढील कारवाई केली जात आहे. या हल्ल्यात किमान ४१ विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याची माहिती सांगितली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. युगांडाच्या पोलीस दल आणि लष्कराने या परिसराचा ताबा घेतला आहे.
एडीएफच्या सुमारे ४० ते ५० बंडखोरांनी शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एमपोंडवे येथील ल्हुबिरिरा माध्यमिक विद्यालयावर हल्ला केला. शुक्रवारी मध्यरात्री शाळेला आग लावण्यापूर्वी ४१ विद्यार्थी ठार झाले होते. अठरा विद्यार्थी जखमी झाले. ही शाळा युगांडा-काँगोच्या सीमेवर वसलेली आहे. स्थानिक प्रशासनाकडून शनिवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण या दुर्दैवी घटनेतून कुणीही जिवंत वाचले नसल्याचे सांगितले जात आहे. सैनिकांकडून हल्लेखोरांचा पाठलाग केला जात आहे. संबंधित हल्लेखोर विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने जात असल्याची माहिती ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’चे (डीआरसी) लष्करी प्रवक्ते मेजर बिलाल कटांबा यांनी दिली आहे.
इसिसशी संबंधित बंडखोरांनी एमपोंडवे येथील शाळेवर हल्ला केला. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थांचे दुकानही लुटले. तसेच शाळेला आग लावली. तत्पूर्वी त्यांनी काही विद्यार्थ्यांवर गोळीबार केला असावा आणि त्यानंतरच आग लावण्यात आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत जवळपास ४१ विद्यार्थी ठार झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना बवेरा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. संबंधित आठही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे कटांबा म्हणाले आहेत. गेल्या काही वर्षांत आफ्रिकन देशांमध्ये दहशतवाद पसरला असून त्याचा परिणामही दिसून येत आहे. अनेक आफ्रिकन देश दहशतवादाच्या विळख्यात अडकले आहेत. या देशांमध्ये दररोज दहशतवादी हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत.
हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी लष्करी दल आणि पोलीस दलाच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत. हल्ला होण्यापूर्वी परिसरातील नागरिक गाव सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांचे प्रवक्ते फ्रेड एनांग यांनी दिली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे मृतदेह जाळून टाकण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. हल्लेखोरांचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.