एका राज्यातून दुसऱ्या राज्याऐवजी थेट दुसऱ्या देशात!
#न्यूयाॅर्क
चांगली सेवा, सोई-सुविधा याबाबत अमेरिकेतील अनेक गोष्टींचे उदाहरण जगभरात दिले जाते. मात्र, अनेकदा अमेरिकेत अशा काही गोष्टी घडतात की तेथील सेवेच्या दर्जाबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. अमेरिकन विमान कंपनीने असाच एक पराक्रम केला असून त्यांनी न्यूजर्सी येथील एका महिलेला फ्लोरिडाऐवजी थेट जमैका या देशात नेले. विशेष म्हणजे, या महिलेकडे पासपोर्ट नसतानाही विमान कंपनीने तिला विदेशवारी घडवण्याचा पराक्रम केला.
विमान कंपनीच्या या चुकीमुळे सदर महिलेची चांगलीच पंचाईत झाली. अखेर या प्रकरणी विमान कंपनीने महिलेची माफी मागितली आहे. लिस हेबर्ड असं या महिलेचं नाव आहे. ती फ्रंटिअर या कंपनीच्या विमानात बसली होती. तिने न्यूजर्सीहून फ्लोरिडाला जाण्यासाठी तिकीट काढलं होतं. मात्र एका गडबडीमुळे ती दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसली. हे विमान थेट कॅरेबियन देशाच्या जमैकाला जाऊन पोहोचलं. जमैकाला उतरल्यावर हा संपूर्ण घोळ महिलेच्या लक्षात आला.
एलिस जमैकाच्या विमानतळावर उतरली. यावेळी सुरक्षारक्षकांनी तिची चौकशी केली तेव्हा त्यांना त्यापेक्षाही मोठा धक्का बसला. कारण एलिसकडे पासपोर्टच नव्हता. ती चुकून दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसून जमैकाला आल्याचं कळलं. चेकिंग करताना एअरलाईन कर्मचाऱ्यांनीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे ही गडबड झाली.
या प्रकारावर आपली बाजू मांडताना एलिस म्हणाली, ‘‘मी नेहमीच फ्लाईटने प्रवास करत असते. त्या दिवशीही मी विमानात बसण्यासाठी गेटवर आले. फ्लाईटमध्ये चढण्यापूर्वी मी बाथरूमला गेले. परत आले तेव्हा बोर्डिंग पास चेक करून कर्मचाऱ्याने मला घाई गडबडीत दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसवलं. एन्ट्री गेट चेंज झाल्यामुळे मी फ्लोरिडाऐवजी जमैकाला जाऊन पोहोचले.’’
एलिसच्या पाठीची सर्जरी झालेली आहे. मला पाहून एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांनी थेट विमानातील सीटवर बसवलं. घाईगडबडीत त्यांनी बोर्डिंग पास चेक केला. टेक ऑफ केल्यानंतर चुकीच्या फ्लाईटमध्ये बसल्याचं लक्षात आलं. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. फ्लाइट अटेंडेंटच्या मदतीने मी जमैकाला उतरले. त्यानंतर दुसरं विमान पकडून अमेरिकेला आले आहे, असं तिने सांगितलं.
‘‘आम्ही या घटनेबाबत दिलगीर आहोत. प्रवाशाची माफी मागत आहोत. तिकिटाचे पैसे परत करण्याचा आणि भरपाई देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तसेच जमैका एअरपोर्ट प्रशासनाशी संवाद साधून या प्रकरणाची सोडवणूक केली आहे,’’ असं फ्रंटिअर एअरलाइन्सने म्हटलं आहे.
वृत्तसंस्था