'एका'वरच थांबण्याची जडली सवय
#हेलसिंकी
एकीकडे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला असताना काही देश लोकसंख्या घटल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनलाही घटत्या जन्मदराची चिंता भेडसावते आहे. या पार्श्वभूमीवर फिनलँड सरकारची व्यथा समोर आली आहे. फिनलँडच्या नागरिकांना एकाच अपत्यावर थांबण्याची सवय जडली आहे. त्यामुळे जन्मदरात विक्रमी घसरण नोंदवली गेली आहे. १९७६ सालापासून फिनलँडचा जन्मदर सतत घसरतो आहे. २०२२ सालच्या आकडेवारीनुसार त्या देशात एक महिला, एक अपत्य असे समीकरण स्पष्टपणे समोर आले आहे.
फिनलँडमधील जन्मदरात सातत्याने घसरण होत आली आहे. २०१८ च्या सरकारी आकडेवारीत फिनलँडमध्ये प्रतिमहिला जन्मदर १.२ असा नोंदवण्यात आला होता. अर्थात त्यावेळी किमान एखाद्या कुटुंबात दोन अपत्य असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. लोकसंख्या नियंत्रणासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजना आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेत अपत्यांची संख्या मर्यादित ठेवण्याची वृत्ती वाढीस लागली, ज्याचा परिणाम म्हणून त्या देशातील लोक एकाच अपत्यावर थांबायला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका कुटुंबात दुसरे अपत्य जन्मले आहे अशांची संख्या १९७६ पासून सतत घटत गेली आहे. २०१९ पासून एका कुटुंबात तिसरे अपत्य जन्मल्याची नोंद केवळ १२ टक्क्यांवर आली आहे.
या देशातही घटत्या जन्मदराची समस्या
दक्षिण कोरिया, थायलंड, तैवान सिंगापूर, व्हिएतनाम आणि जपान या काही देशांत जन्मदर घातल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जपानमध्येही सरकारने लोकसंख्या वाढीसाठी लोकांना लग्नासाठी आर्थिक मदत, हनिमूनसाठी भरपगारी सुट्ट्या अशा योजना राबवायला सुरुवात केली आहे.
वृत्तसंस्था