इजिप्तमध्ये महागाईने कळस गाठला
#काहिरा
पाकिस्तान पाठोपाठ आणखी एक इस्लामिक देश आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इजिप्तची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत असून महागाई दराने मागच्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. २०२३ च्या जानेवारीत २६ टक्क्यांवर असणारा महागाई दर फेब्रुवारीत ३२.९ टक्क्यांवर पोहचला असून अन्नधान्याच्या किमती ६१.५ टक्क्यांनी वाढल्या असून आरोग्य, सार्वजनिक वाहतूक इत्यादी क्षेत्रात महागाईने कळस गाठला आहे.
इजिप्तची आर्थिक अवस्था आधीच नाजूक त्यात आता महागाईने डोके वर काढल्याने सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अन्नधान्य महाग, प्रवास महाग, औषधोपचार महाग झाले आहेत. कपडे आणि पादत्राणांच्या किमतीत १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. विविध वस्तू आणि सेवांच्या किमतीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. इजिप्त सरकारकडे आयातीसाठी विदेशी चलनाचा पुरेसा साठा शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर पौंडांचे अवमूल्यन करण्याची वेळ आली आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सरकारला नागरिकत्व विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पाकिस्तानसारखीच इजिप्तची दुरवस्था झाली आहे. सत्ता लष्कराच्या ताब्यात, धर्मांधता, भ्रष्टाचार यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकडे दुर्लक्ष झाले आहे. इजिप्तमधील १० कोटीपेक्षा लोक दारिद्र्यरेषेखाली दिवस काढत आहेत. त्यात इजिप्त सरकारने नव्या प्रशासकीय शहराच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. केवळ लष्कराच्या अट्टाहासापोटी देशाला ५० अब्ज डॉलरची उधळपट्टी सहन करावी लागत आहे.वृत्तसंंस्था