युगांडात भारतीय बँक कर्मचाऱ्याची हत्या
#कम्पाला
कर्जाची रक्कम परत न केल्याने बँक कर्मचारी आणि कर्जदारांमध्ये नेहमीच वाद होतात. परंतु आफ्रिकन देश युगांडात एका कर्जदाराने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. येथील एका भारतीय व्यक्तीची कर्जासंदर्भातल्या वादातून पोलीस हवालदारानेच गोळ्या झाडून हत्या केली आहे.
ही घटना बुधवारी युगांडाची राजधानी कम्पाला येथे घडली आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम भंडारी या मूळ भारतीय असलेल्या बँक कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. मारेकरी पोलीस हवालदार हा ३० वर्षांचा असून त्याचे नाव इव्हान वाबवायर असे आहे. इव्हानने या हत्येसाठी आधी एके -४७ रायफल चोरली. त्याच रायफलने त्याने उत्तम भंडारींवर गोळ्या झाडल्या.
इव्हानवर २१ लाख शिलिंग (४६,००० रुपये) कर्ज होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार इव्हान वाबवायरने भंडारी यांच्यावर अनेक राऊंड गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर बँकेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान, बँकेतले लोक गोळीबारानंतर पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून १३ गोळ्या जप्त केल्या आहेत. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यावरून भंडारी आणि आरोपीमध्ये गैरसमज झाला होता. वाबवायरला १२ मे रोजी कर्जाच्या रकमेची माहिती मिळताच त्याने भंडारी यांच्याशी वाद सुरू केला. कर्जाचा आकडा वाढवल्याचा त्याचा दावा होता. तो काही वेळ शांत उभा होता, नंतर अचानक त्याने बंदूक उचलली आणि गोळीबार सुरू केला. दरम्यान, कम्पाला महानगर पोलिसांचे प्रवक्ते पॅट्रिक ओनयांगो म्हणाले, भंडारी यांची हत्या करून वाबवायर बंदूक तिथेच टाकून पळून गेला. वाबवायर एक मानसिक रुग्ण आहे. पोलिसांनी सांगितले की, वाबवायरने त्याच्या रूममेटची बंदूक चोरली होती.