शस्त्रास्त्र खरेदीत भारत पुन्हा अव्वल
#वॉशिंग्टन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया'चा गजर करत असले तरीही त्यांचा भर परदेशातून शस्त्रास्त्र आयात करण्यावरच राहिला आहे. या संदर्भातील स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिट्यूट (सिपरी) या थिंक टॅन्कचा अहवाल सोमवारी (१३ मार्च) प्रकाशित करण्यात आला असून यात भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भुकेकंगाल झालेला पाकिस्तान हा देश सर्वाधिक खरेदीदारांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
२०१३-२०१८ आणि २०१८-२०२२ या कालावधीत भारताच्या परदेशातून शस्त्रास्त्र आयात करण्याच्या प्रमाणात ११ टक्क्यांची घट दिसून आली होती. मात्र तरीही आजमितीस भारत हाच जगभरातील सर्वाधिक प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करणारा देश ठरला आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी सुरू झाली असून सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत युक्रेनचा तिसरा क्रमांक लागला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपियन देशांमध्ये शस्त्रास्त्र खरेदीचा ट्रेंड आल्याची माहिती 'सिपरी'चे ज्येष्ठ संशोधक पीटर व्हेजमिन यांनी दिली आहे.
शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रियेतील गुंतागुंत, खरेदी प्रक्रियेतील विविधता आणि देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेस चालना देण्याच्या धोरणामुळेच २०१३-२०१८ आणि २०१८-२०२२ या कालावधीत भारताच्या परदेशातून शस्त्रास्त्र आयात करण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले होते. या अहवालानुसार २०१८ ते २०२२ या काळात भारत, सौदी अरब, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे देश सर्वाधिक शस्त्रास्त्र आयातदार देश राहिले आहेत. तर या कालावधीत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन या देशांनी शस्त्रास्त्रांची सर्वाधिक निर्यात केली आहे.
या इस्लामिक देशांनी केली मोठी आयात
'सिपरी' च्या अहवालातील माहितीनुसार २०१८ ते २०२२ दरम्यान सर्वाधिक शस्त्रास्त्र आयातदारांच्या यादीत मध्य-पूर्वेतील तीन देशांचा समावेश आहे. हे तिन्ही देश इस्लामिक देश आहेत. सौदी अरब, कतार आणि इजिप्त या देशांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. या काळात भारताखालोखाल सौदी अरबने सर्वाधिक शस्त्रखरेदी केली आहे. परदेशातून शस्त्रास्त्र आयात करण्याचे सौदी अरबचे प्रमाण १० टक्के होते. २०१८-२०२२ या काळात आयातीचे प्रमाण ३११ टक्क्यांनी वाढले आहे. वृत्तसंस्था