भारताची अफगाणिस्तानला मदत
#काबूल
भारताने इराणच्या चाबहार बंदरातून २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा केली. ही मदत पाकिस्तानातून न पाठवता इराणमार्गे पोहचवली जाणार आहे. विशेष म्हणजे भारताने अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला अद्याप मान्यता दिलेली नाही. याबाबतची बोलणी सुरु आहे. मात्र मानवी भावनेतून भारताने ही मदत जाहीर केली आहे.
मंगळवारी (७ मार्च) भारतात अफगाणिस्तानबाबत भारत-मध्य आशिया संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत यजमान भारताव्यतिरिक्त मध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे विशेष वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यकर्माचा भाग म्हणून भारताने अफगाणिस्तानला ही मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ही मदत काबूलला पाकिस्तानच्या माध्यमातून नाही तर इराणच्या चाबहार बंदरातून दिली जाणार आहे. भारत आणि पाच मध्य आशियाई देशांनी दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या प्रादेशिक धोक्यांचा एकत्रितपणे सामना करण्याविषयी चर्चा केली. यापूर्वी भारताने २०२० साली ७५ हजार टन गहू चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानला पाठवला होता. यापूर्वीही भारताने सुमारे ४० हजार मेट्रिक टन गहू पाकिस्तानमार्गे रस्त्याने पुरवठा केला होता. परंतु त्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता.वृत्तसंंस्था