भारताने सागरी चाच्यांना पुन्हा नमवले!
#मोगादिशू
सागरी चाचांनी एमव्ही अब्दुल्ला या बांगलादेशी मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडला आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून ६०० मैल पूर्वेला हिंद महासागरात ही घटना घडली. हे जहाज मोझांबिकमधील मापुटो बंदरातून संयुक्त अरब अमिरातीमधील अल हमरिया बंदराकडे जात होते.जहाजात सुमारे ५८ हजार टन कोळसा होता.
या घटनेची भारतीय नौदलाला माहिती कळाल्यानंतर त्यांनी एक युद्धनौका आणि एक लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान तैनात करून जहाजाची त्याची सुटका केली. नौदलाने एमव्ही अब्दुल्ला जहाजावरील समुद्री चाच्यांच्या हल्ल्याला युद्धनौका आणि विमानाच्या मदतीने तोंड दिले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सागरी गस्त विमान तैनात करण्यात आले. १२ मार्चला संध्याकाळी जहाजातील चालक दलाचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अथक प्रयत्नांनंतर भारतीय युद्धनौकेने अपहरण केलेल्या व्यापारी जहाजाला अडवले. युद्धनौकेने १४ मार्च रोजी सकाळी बांगलादेशी जहाज यशस्वीरित्या रोखले. जहाज रोखल्यानंतर अपहृत क्रू मेंबर्सची (सर्व बांगलादेशी नागरिक) सुटका करण्यात आली. सोमालियाच्या सागरी हद्दीत पोहोचेपर्यंत नौदलाच्या युद्धनौकेने एमव्ही अब्दुल्ला जहाजाला संर७ण दिले.
अल जझीर वृत्त संकेतस्थळाने सागरी सुरक्षा फर्म एम्ब्रेच्या हवाल्याने म्हटले आहे की, ही घटना सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या पूर्वेला ६०० सागरी मैल अंतरावर हिंद महासागरात घडली आहे. डिसेंबरपासून सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. तसेच येमेनच्या हुथी बंडखोरांनी सुरू केलेल्या जहाजावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये, भारतीय नौदलाने पश्चिम हिंदी महासागरातील अनेक व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यात मदत केली आहे.
मार्चच्या सुरुवातीला नौदलाने ११ इराणी आणि आठ पाकिस्तानी सागरी कर्मचाऱ्यांची सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर सागरी चाच्यांपासून सुटका केली होती. जानेवारीत आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर पाकिस्तानी नौकेतील १९ जणांची सुटका केली होती. नौदलाने ५ जानेवारी रोजी उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या लायबेरियन ध्वजांकित जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला.
वृत्तसंस्था